डोंबिवली : फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मैत्री, मग प्रेमाचे नाटक, विश्वास जिंकून शारीरिक संबंध आणि शेवटी त्यांच्याच नावावर लाखो रूपयांचे कर्ज काढून पोबारा...असा फंडा वापरणाऱ्या आदर्श म्हात्रे (३४) याचा पर्दाफाश झाला आहे. डोंबिवलीतील एका पीडित तरूणीने धाडस दाखवून मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने आदर्शचे बिंग फुटले.. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आदर्श म्हात्रे याला बेड्या ठोकल्या आहेत.
तक्रारदारांची संख्या पाहून पोलिस अवाक्
फेसबुक-इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवून मैत्री करणे, प्रेमाच्या जाळ्यात ओढून भावनिक जवळीक व शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, विश्वास संपादन करून त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून त्यांच्याच नावावर बँकांमधून लाखो रुपयांचे कर्ज मंजूर करून घेणे आणि शेवटी पैसे हातात येताच मोबाईल बंद करून पोबारा करणे, असा या बदमाशाचा फसवणूक करण्याचा फंडा असायचा. तपासात समोर आलेली 140 हून अधिक तरूणींची आकडेवारी पाहून पोलिसही अवाक् झाले आहेत. यापूर्वी याच स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती.
11 तरूणींचे धाडस...अन् झाली अटक
फसवणुकीला कंटाळून आतापर्यंत ११ पीडित महिला व तरूणींनी धाडस दाखवून पोलिसांकडे अधिकृत तक्रारी नोंदविल्या आहेत. नवी मुंबई पोलिसांनी आदर्शला अटक केल्याची बातमी आल्यानंतर डोंबिवलीतील एका पिडीत तरूणीनेही धाडस दाखवून मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी या तरूणीला धीर देऊन आरोपीच्या विरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार पिडीत तरूणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास चक्रांना वेग देऊन आरोपी आदर्श म्हात्रे याचा ताबा घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
आदर्श म्हात्रे याच्या विरोधात फसवणूक, विश्वासघात व आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असून आणखी किती तरूणींची फसवणूक झाली आहे याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे खास पथक करत आहे.
पोलिसांचे आवाहन
समाज माध्यमांवरील अनोळखी व्यक्तींवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. आर्थिक व्यवहार व कागदपत्रे शेअर करताना सावध रहा. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर सेल किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधा.