डोंबिवली :
एकीकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सर्व यंत्रणा मशगूल आहेत, तर दुसरीकडे डोंबिवलीत सुरू असलेल्या विकास कामांबद्दल कुणीही बोलायचे नाही, ऐकायचे नाही अन् पहायचे देखिल नाही, अशी परिस्थिती विकासाची कामे करणाऱ्या ठेकेदारांच्या बेपर्वा कारभाराबद्दल उद्भवली आहे.
एमआयडीसीच्या निवासी विभागात रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या गटारांचे बांधकाम सुरू असतानाच अचानक ड्रेनेज लाईन फुटल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी सुटून डास/मच्छरांचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. काही ठिकाणी तर ठेकेदार अर्धवट काम सोडून पसार झाल्याने त्याचा फटका परिसरातील रहिवाशांना बसला आहे.
मिलापनगरमध्ये भूखंड क्रमांक आर एल २९ आणि ३० समोर रस्त्याच्या दुतर्फा नव्याने गटारांचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. आसपासच्या सोसायट्या, बंगले आणि घरांना जोडलेल्या सांडपाण्याच्या लाईन या गटारांना जोडून भूमिगत लाईनला जोडण्याचे काम सुरू आहे. मात्र गटारांचे बांधकाम सुरू असतानाच जेसीबीच्या धक्क्याने सांडपाण्याच्या लाईन फुटून त्याचे सांडपाणी वाहून सर्वत्र पसरत चालले आहे. उद्भवलेल्या गंभीर समस्येची तक्रार परिसरातील रहिवाशांनी एमआयडीसी, केडीएमसी आणि ठेकेदाराकडे केली. मात्र तक्रारींची कुणीही दखल घेत नसल्याचे दिसत आहे.
गेल्या १५ दिवसांपासून हे सांडपाणी वाहत असतानाच गटारांचे बांधकाम ठेकेदाराने थांबविले आहे. अशा अर्धवट कामामुळे सोसायटी/बंगल्यात जाण्या/येण्यासाठी रहिवाशांना कसरत करावी लागत आहे. शिवाय दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे परिसरात भीषण रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच अशा परिस्थितीत कदाचित अर्धवट बांधकाम केलेल्या गटारात पडून एखाद्याला मोठी दुखापत होऊ शकते. अशी परिस्थिती एमआयडीसी निवासी विभागामध्ये सर्वत्र आढळून येत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी या भागातील त्रस्त रहिवाशी करत आहेत. विशेष म्हणजे एमआयडीसीमध्ये काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर नवीन गटारे/नाले, भूमिगत सांडपाणी वाहिन्या, पाणी आणि वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची कामे होत आहेत. मात्र नवीन बनविलेल्या काँक्रिट रस्त्यांची दुर्दशा वाढत चालली आहे.
पोलिसांकडून ऑन द स्पॉट दखल
रस्त्यांच्या दुतर्फा गटारांचे बांधकाम करताना त्याची आरसीसी भिंत तयार करण्यासाठी सिमेंट काँक्रिटचा मिक्सर ट्रक मध्यरात्री येऊन त्याचे काम पहाटेपर्यंत चालू ठेवले जात होते. त्यामुळे त्याच्या आवाजाने रहिवाशांची झोपमोड होत असे. वास्तविक पाहता अशी कामे रात्रीच्या सुमारास करण्यास या भागातील जागरूक रहिवासी तथा ख्यातनाम डॉक्टर मंगेश व अर्चना पाटे या दाम्पत्याने हरकत घेऊन पोलिसांकडे फोनद्वारे तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
ड्रेनेज लाईन फुटून सांडपाणी पसरले
परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदाराला तंबी देऊन पोलिसांनी तात्काळ काम थांबविले. मात्र ड्रेनेज लाईन फुटून सांडपाणी सर्वत्र वाहत असल्याने रहिवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येसंदर्भात डॉक्टर पाटे दाम्पत्यासह इतरही अनेक रहिवाशांनी तक्रार केली. मात्र या तक्रारीची अद्यापही दखल का घेतली जात नाही ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सद्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. बहुतांशी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्युटी लावली गेली आहे. त्यामुळे शासन/प्रशासनाला अत्यावशक प्रश्नांकडे पाहण्यासाठी वेळ मिळत नसेल असे दिसत आहे. किमान निवडणुकीला उभे राहणाऱ्या वा बिनविरोध निवडून आलेल्यांनी यात लक्ष घालावे, अशी अपेक्षा समाज माध्यमांवर सचित्र माहिती प्रसारित करणाऱ्या जागरूक रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केली आहे.