रमेश मात्रे याचा मुलगा प्रवीण म्हात्रे 
ठाणे

Dombivli Crime | नगरसेवक रमेश म्हात्रेचा मुलगा प्रवीण गेला कुणीकडे? बनावट कागदपत्रे देऊन केली अनेकांची फसवणूक!

महिनाभरात होणार अटकेची कारवाई, पोलिसांच्या आश्वासनानंतर तक्रारदाराचे उपोषण स्थगित,

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : पश्चिमेकडील जुन्या डोंबिवली परिसरात उभारण्यात आलेल्या आरोह हाईट्स या बेकायदा इमारत प्रकरणात बनावट सरकारी कागदपत्रे तयार करून शेकडो रहिवाशांची फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याचा मुलगा प्रवीण हा फरार आहे. डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रे हे अटकेत असून त्‍याच्या मुलग्याच्या कृत्‍याने रमेश म्हात्रे याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणात प्रवीण म्हात्रे अद्याप फरार असून, या गुन्ह्याचा तपास एका महिन्याच्या आत पूर्ण करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन विष्णूनगर पोलिसांनी तक्रारदाराला दिले आहे.

   या प्रकरणातील तक्रारदार कल्पेश जोशी यांनी गेल्या वर्षभरापासून प्रवीण म्हात्रे यांच्या अटकेसाठी सातत्याने स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा केला आहे. जोशी यांच्या म्हणण्यानुसार, राजकीय आश्रयामुळे आरोपी प्रवीणवर अद्याप कारवाई झालेली नाही. अलीकडेच नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टर मारहाण प्रकरणात अटक झाल्यानंतर प्रवीण म्हात्रे यांच्याविरोधातील कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

    कल्पेश जोशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पश्चिम डोंबिवलीतील आरोह हाईट्स या इमारतीसंदर्भात जमिनीचे कथित बनावट सात/बारा उतारे, फेरफार नोंदी, तसेच केडीएमसीची बनावट बांधकाम कागदपत्रे तयार करण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे सदनिकाधारकांना इमारत अधिकृत असल्याचा विश्वास देत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही प्रवीण म्हात्रे फरार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

उपोषणाचा इशारा अन् पोलिसांची धावपळ

रमेश म्हात्रे यांचा मुलगा प्रवीण म्हात्रे याला तातडीने अटक करावी या मागणीसाठी तक्रारदार कल्पेश जोशी यांनी कल्याण येथील पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणामुळे पोलिसांवर दबाव वाढला. त्यानंतर पोलिसांनी जोशी यांची समजूत काढत त्यांची डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांच्यासोबत बैठक आयोजित केली. बैठकीदरम्यान पोलिसांनी सांगितले की, या गुन्ह्याचा प्रारंभीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी मोठ्या प्रमाणात पूर्ण केला होता. त्यांच्या बदलीनंतर तपासाची जबाबदारी नव्याने रूजू झालेल्या पोलिस निरीक्षक आरम्या क्षीरसागर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासातील सर्व कागदपत्रांची छाननी करून आरोपींची भूमिका, त्याचा सहभाग आणि आर्थिक व्यवहार यांचा सखोल तपास सुरू असून तो एका महिन्यांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी

पोलिसांनी तपास एका महिन्यात पूर्ण करून कायद्यानुसार आवश्यक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तक्रारदारांनी उपोषण स्थगित केले आहे. मात्र, दिलेल्या मुदतीत कारवाई झाली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि प्रवीण म्हात्रे यांच्यावरील संभाव्य कारवाईकडे आता डोंबिवलीसह संपूर्ण कल्याण परिसराचे लक्ष लागले आहे. तक्रारदार कल्पेश जोशी यांनी केडीसी आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, तसेच कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे नगरसेवक रमेश म्हात्रे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणीही केली आहे. या मागणीवर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT