Pudhari
ठाणे

Dombivli Crime : डोंबिवलीत ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची धाड; अश्लील नृत्यावर कारवाई, ३३ जणांवर गुन्हे

तोकड्या कपड्यांतील नृत्यांगनांकडून बीभत्स नृत्य, ग्राहकांकडून पैशांची उधळण होत असल्याची तक्रार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या गोळवली गावाजवळील 'मेला' या नावाने रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या बारमध्ये सुरू असलेल्या अश्लील नृत्याबाबत वाढत्या तक्रारींनंतर मानपाडा पोलिसांनी ही धडक कारवाई केली. यात ३३ जणांविरोधात अश्लील नृत्य व महिलांच्या प्रतिष्ठेच्या संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोळवली परिसरातील त्रस्त रहिवाशांनी या बारमध्ये रात्री उशिरापर्यंत तोकड्या कपड्यांतील नृत्यांगनांकडून बीभत्स नृत्य करून घेतले जात असल्याची आणि ग्राहकांकडून पैशांची उधळण होत असल्याची तक्रार पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत, पोलीस उपायुक्त झेंडे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मेला ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला.

छाप्यादरम्यान बारमध्ये मराठी आणि हिंदी गाण्यांवर नृत्यांगना तोकड्या कपड्यांत अश्लील हातवारे करत नृत्य करताना आढळल्या. ग्राहक आणि वेटर त्यांना प्रोत्साहन देत होते. पोलिसांना पाहताच काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. बारमध्ये एकूण ३३ जण आढळून आले. यात १० नृत्यांगना, ८ गायिका, ८ ग्राहक, बार मालक, व्यवस्थापक, वेटर आणि वादकांचा समावेश आहे. बारच्या तपासणीदरम्यान ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी बार मालक संजय कांबळे (रा. जरीमरी नगर, कल्याण-पूर्व), व्यवस्थापक जितेंद्र तिवारी (रा. खडेगोळवली, कल्याण-पूर्व), रोखपाल जितेंद्र कापरे, वाद्यवृंद चालक हरीश शेट्टी यांच्यासह वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह महाराष्ट्र हॉटेल व उपहारगृहे कायदा, बीभत्स वर्तन प्रतिबंधक कायदा आणि महिलांच्या प्रतिष्ठेच्या संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाचे नियम पायदळी

कल्याण-शिळ महामार्ग, कल्याण-मलंगगड रोड आणि काटई-बदलापूर पाइपलाइन महामार्गावर जवळपास डझनभर ऑर्केस्ट्रा बार चालतात. लखलखणारी विद्युत रोषणाई, कानठळ्या बसवणारा डीजेचा आवाज, तसेच रात्रभर मद्यपी आणि बारबालांची चालणारी रेलचेल यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांनी कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. अशा बारमध्ये शासनाचे नियम सर्रास पायदळी तुडवले जात असल्याने, पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.

कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त

डीसीपी अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार कल्याण-शिळ महामार्गावर रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारवर यापूर्वीही धाडी टाकण्यात आल्या आहेत. बारबालांच्या नादी लागून संसाराची उद्ध्वस्ततेकडे वाटचाल थांबवण्यासाठी अशा धाडींची वारंवार पुनरावृत्ती व्हावी, अशी मागणी मद्यपींच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. पोलीस परिमंडळ ३ च्या हद्दीत रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बारवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने परिसरातील रहिवाशांसह व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT