डोंबिवली : डोंबिवलीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३७ वर्षीय बदमाशाने आधी विनयभंग केला. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करून अतिप्रसंग करण्याचाही त्याने प्रयत्न केला. मात्र मुलीने कडवी झुंज देत आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला. घडलेला प्रकार तिने आईला सांगताच आईने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून इक्बाल नन्हेबक्ष अन्सारी (३७) याला तात्काळ अटक केली.
डोंबिवली पूर्वेतील ग्रामीण परिसरामध्ये पिडीत मुलगी तिच्या आई, वडील आणि तीन भावंडांसह राहते. तर आरोपी इकबाल हा देखील त्यांच्याच घरात राहण्यास आहे. मुलीचे आई-वडील आणि इक्बाल असे तिघेही मजूरीचे काम करतात. मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास मुलगी घरात भांडी घासत होती. इतक्यात इकबाल याने दाराला कडी लावून घेत या मुलीसोबत लज्जास्पद वर्तन केले. अचानक घडलेल्या प्रकाराने मुलगी भयभीत झाली होती. तिने इक्बालच्या कृत्याला कडाडून विरोध करत घराबाहेर धाव घेतली. तरीही इक्बालने घरात ओढून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
इक्बालने केलेल्या कृत्याचा प्रकार मुलीने तिच्या आई-वडिलांना सांगितला. आईने तात्काळ रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलीवर बेतलेल्या प्रसंगाची पोलिसांना कहाणी सांगितली. पोलिसांनी धीर देऊन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार इक्बालच्या विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी इक्बाल अन्सारी याला तात्काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विक्रम गौड यांनी दिली.