ठाणे

Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हॉटेल चालकासह तिघांना मानपाडा पोलिसांकडून अटक

अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी दोनजण अल्पवयीन

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली जवळच्या ग्रामीण परिसरात राहणारी एक अल्पवयीन मुलगी गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. मात्र, या मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचार करून पसार झालेल्या चायनीज हॉटेलच्या चालकासह तिघांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघेजण अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी घरात वाद झाल्याने एका व्यक्तीसोबत निघून गेली होती. कटाई-बदलापूर पाईपलाईन रोडवरील एका चायनीज हॉटेलमध्ये ती जेवणासाठी गेली असता, तिच्याकडे पैसे नव्हते. हे पाहून हॉटेल चालकाने मदत करण्याच्या बहाण्याने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर हॉटेल चालक अंगूर ठाकूर (वय २२) याने तिची ओळख परिसरातील दोन अल्पवयीन मुलांशी करून दिली.

मुलीने आपली अडचण सांगताच, तिघांनी तिला नोकरी आणि राहण्याची सोय करून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्या घटनेनंतर संशयीत आरोपी पळून गेले. पीडित मुलगी चालत कुळगाव-बदलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली. तिची अवस्था पाहून स्थानिक रहिवाशांनी चौकशी केली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. जागरुक रहिवाशांनी पीडित मुलीला तात्काळ स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले.

मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर कुळगाव-बदलापूर पोलिसांनी तिला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीच ही मुलगी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. यातील मुख्य आरोपी अंगूर ठाकूर याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT