डोंबिवली : एकीकडे घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असताना केवळ मित्र-मैत्रिणीसोबत गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेल्याच्या रागातून संशयखोर पतीने पत्नीवर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून चार मुलांच्या प्रसंगावधानामुळे तिचा जीव वाचला. संतोष पेटेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये ज्योती यांचा संतोष पेटेकर याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर पतीकडून सतत संशय घेणे, तसेच वारंवार मारहाण करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे. सततच्या त्रासाला कंटाळून २०२० मध्ये ज्योती या आपल्या चार मुलांसह पतीपासून वेगळ्या राहू लागल्या. त्या स्वतः कष्ट करून चारही मुलांचा सांभाळ करत होत्या. दरम्यान, पती-पत्नीमध्ये घटस्फोटाची प्रक्रिया न्यायालयात सुरू होती. तरीही आरोपीकडून त्रास सुरूच असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
गणपती उत्सवादरम्यान ज्योती या मित्र-मैत्रिणीसोबत गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेल्या होत्या. याचा राग मनात धरून आरोपी संतोष हा ज्योती यांच्या राहत्या घरी गेला. ‘तू मित्रांसोबत का फिरायला गेलीस?’ अशी विचारणा करत त्याने वाद घातला आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने ज्योती यांच्या छातीवर वार केला. हा वार गंभीर असल्याने ज्योती या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या.
आईवर हल्ला होत असल्याचे पाहताच चारही मुलांनी प्रसंगावधान दाखवले. त्यांनी घराबाहेर धाव घेत आजी आणि मावशीकडे जाऊन मदतीसाठी आरडाओरड केली. मुलांचा आवाज ऐकून नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील ज्योती यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या झटापटीत आरोपीने ज्योती यांच्या बहिणीलाही मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या ज्योती यांच्यावर सध्या ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी जखमी ज्योती पेटेकर यांच्या जबानीवरून गुन्हा नोंदवून हल्लेखोर संतोष पेटेकर याला अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अभिजीत मोरे आणि त्यांचे सहकारी अधिक तपास करत आहेत.