ठाणे

Dombivali Crime : डोंबिवलीत मद्यधुंद टोळक्याचा मध्यरात्री थरार; अनेक वाहनांची नासधूस करत दोन दुचाकी जाळल्या

विठ्ठलवाडीत वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : विठ्ठलवाडी ते खडेगोळवली परिसरामध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद टोळक्याने अक्षरशः धुमाकूळ घालत प्रचंड दहशत माजवली. रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या अनेक चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नासधूस करण्यात आली, तर दोन दुचाकी पेटवून देत खाक करण्यात आल्या. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी खडेगोळवली परिसरात हैदोस घालण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेत असलेल्या या टोळक्याने रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य केले. त्यांनी बेछूट दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडल्या. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने दोन दुचाकींना आग लावली. वाहनांतील पेट्रोलमुळे आगीचा मोठा भडका उडाला. या आगीच्या झळा इतक्या तीव्र होत्या की आजूबाजूच्या घरांच्या छतांचेही मोठे नुकसान झाले. मध्यरात्रीच्या वेळी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गाढ झोपेत असलेले स्थानिक नागरिक प्रचंड भयभीत झाले.

घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत या कृत्यात सहभागी असलेल्या दोन संशयितांना बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या टवाळखोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दरम्यान, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड आणि वाढत्या गुंडगिरीच्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त करत प्रभाग १३ चे नगरसेवक मयूर म्हात्रे यांनी या घटनेचा जाहीर निषेध केला आहे. रहिवाशांच्या जीवित आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. परिसरातील अमली पदार्थांची विक्री आणि समाजकंटकांच्या वाढत्या उपद्रवाला तातडीने आळा घालण्याची मागणी करणारे निवेदन त्यांनी पोलिसांना दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT