Pudhari File Photo
ठाणे

Dombivali Crime : डोंबिवलीत किरकोळ वादातून रक्तरंजित संघर्ष; कार चालकावर जीवघेणा हल्ला, तिघांना बेड्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : रस्त्यात गाडी उभी करण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. केवळ बाजूला होण्यास सांगितल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून कार चालक आणि त्याच्या मित्रावर दगडानी प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी तातडीने हालचाली करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

डोंबिवली पश्चिमेकडील सत्यवान चौक परिसरात ही घटना घडली. कार चालक अमित पाटील हे आपल्या कारने जात असताना रस्त्यात गाडी उभी करून गप्पा मारणाऱ्या तिघांना त्यांनी गाडी बाजूला घेण्याची विनंती केली. मात्र, समोरच्या तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अमित यांनी दोन-तीन वेळा हॉर्न वाजवताच या तरुणांचा पारा चढला.

संतापाच्या भरात या तिघांनी अमित पाटील आणि त्यांचा मित्र यश म्हात्रे यांच्यावर हल्ला चढवला. रस्त्यावरील दगड उचलून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आणि कारचीही मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या हल्ल्यात अमित आणि यश दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांची कारवाई आणि आरोपींची पार्श्वभूमी

घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी तपास चक्रे फिरवून प्रितेश उर्फ राम्या म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि योगेश सुर्वे या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.

दहशतखोर गुन्हेगार जेरबंद

अटक करण्यात आलेल्यांपैकी राम्या म्हात्रे आणि सचिन म्हात्रे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत. परिसरात त्यांची मोठी दहशत असल्याचे समजते.

५ दिवसांची पोलीस कोठडी

पोलिसांनी तिन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT