ठाणे

Dombivali Crime : ३६ लाखांचा गंडा घालून फरार झालेला आरोपी डोंबिवली पोलिसांच्या जाळ्यात, अक्कलकोटमधून मुसक्या आवळल्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : ट्रान्सपोर्ट व्यवसायात गुंतवणूक केल्यास 'दामदुप्पट' परतावा देण्याचे आमिष दाखवून आपल्याच मित्रांना तब्बल ३६ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या एका सराईत ठगाला विष्णूनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या एका वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी स्वतःच्याच पत्नीशी मोबाईलवर बोलताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्याला अक्कलकोट येथून ताब्यात घेतले आहे.

नेमके प्रकरण काय?

डोंबिवली परिसरात राहणाऱ्या आशिष पवार याने आपल्या तीन मित्रना जाळ्यात ओढले होते. "माझ्या ट्रान्सपोर्ट कंपनीत गुंतवणूक करा, तुम्हाला मोठा नफा मिळवून देतो," असे सांगून त्याने त्यांच्याकडून ३६ लाख रुपये उकळले. मात्र, परतावा देण्याची वेळ आल्यावर त्याने पोबारा केला. पैसे लाटल्यानंतर त्याने आपण बेपत्ता झाल्याचा बनाव रचला.

पत्नीच्या 'मिसिंग' तक्रारीने पोलिसांना संशय

आशिष फरार झाल्यानंतर, त्याचा शोध लागू नये म्हणून त्याच्या पत्नीने तो हरवल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र, तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. आशिष हा खरंतर फरार नसून तो सातत्याने आपल्या पत्नीच्या संपर्कात होता. मित्रांचे पैसे परत करता येत नसल्याने त्याने बेपत्ता होण्याचे नाटक रचल्याचे तपासात स्पष्ट झाले.

अक्कलकोटमध्ये रचला सापळा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल लोकेशनचा मागोवा घेतला. तपासात तो अक्कलकोट येथील एका कंपनीत नाव बदलून काम करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या पथकाने तातडीने अक्कलकोट गाठून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

आरोपीविरुद्ध एक वर्षांपूर्वीच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मोबाईल संभाषणाने अखेर या भामट्याचा खेळ खल्लास केला असून, विष्णूनगर पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT