AI Image 
ठाणे

Dombivli Crime : डोंबिवलीत मोठी कारवाई, २४ नायजेरियन नागरिकांची धरपकड; ११ घरमालकांवर गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीजवळच्या खोणी-पलावा येथील उच्चभ्रू गृहसंकुलांमध्ये छुप्या मार्गाने वास्तव्यास असलेल्या तब्बल २४ नायजेरियन नागरिकांना नवी मुंबई आणि मानपाडा पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले आहे. यामध्ये अंमली पदार्थ तस्करीत सहभागी असलेल्या संशयितांचाही समावेश आहे. या परदेशी नागरिकांना नियमांचे उल्लंघन करून घरे भाड्याने देणाऱ्या ११ घरमालकांवर आणि एका एजंटवर मानपाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अंमली पदार्थ तस्करीत हवा असलेला नायजेरियन नागरिक पॉल चिगबटा उर्फ एझे चिगबटा हा खोणी-पलावा परिसरात राहत असल्याची गुप्त माहिती नवी मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नवी मुंबई आणि मानपाडा पोलिसांनी या परिसरात अचानक धाड टाकून २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. यात १३ पुरुष, ७ महिला आणि ४ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मात्र, या कारवाईत मुख्य संशयित पॉल चिगबटा पोलिसांना सापडला नाही.

नियमांचे उल्लंघन आणि गुन्हा दाखल

पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, खारघर येथील सुदाम गोरे या एजंटने घरमालकांशी संगनमत करून या परदेशी नागरिकांना घरे भाड्याने मिळवून दिली होती. परदेशी नागरिकांना घर भाड्याने देताना भारत सरकारच्या 'फॉरेनर्स' पोर्टलवर 'सी' (C) फॉर्म भरून माहिती देणे आणि स्थानिक पोलिसांना कळवणे बंधनकारक असते. मात्र, खोणी-पलावा येथील ११ घरमालकांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता त्यांना आश्रय दिला होता.

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार प्रीतम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरमालक आणि एजंट सुदाम गोरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि परदेशी नागरिक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या २४ पैकी केवळ ८ जणांकडे वैध व्हिसा आणि पासपोर्ट आहेत. उर्वरित नागरिकांचे कागदपत्रे विविध गुन्ह्यांच्या तपासामुळे न्यायालयात जमा असल्याचे समजते. कल्याण-डोंबिवली परिसरात नियमांचे उल्लंघन करून परदेशी नागरिकांना घरे भाड्याने देणाऱ्या घरमालकांवर इतक्या मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT