बाजारात एखादं फळ येतं आणि खवय्यांची झडप पडते, पण काही फळं अशी असतात की, त्यांची खवय्यांना वर्षभर आतुरतेने वाट बघावी लागते. अशाच आकर्षक, लालसर, आंबट-गोड ‘चेरी’ची सध्या डोंबिवलीच्या बाजारात चुरस सुरू आहे. फक्त जून महिन्यापुरताच मिळणार्या या स्वादिष्ट फळाने खवय्यांची मनं जिंकली असून, दरवाढ असूनही ग्राहकांचा ओघ कायम आहे.
हिमाचल प्रदेश, पठाणकोट व काश्मीरहून डोंबिवलीच्या बाजारात चेरी दाखल झाली आहे. विशेषतः काश्मिरी चेरी अधिक गोडसर असल्याने तिला सध्या सर्वाधिक मागणी आहे. मात्र यंदा भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीरहून पुरवठा उशिरा झाल्याने बाजारात चेरी थोडी उशिरा दाखल झाली. तरीही सुरुवात होताच ग्राहकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
बाजारात सध्या ‘मिश्र’ आणि ‘मखमली’ हे चेरीचे प्रमुख प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील ‘मिश्र’ चेरी अधिक गोडसर असल्यामुळे ती ग्राहकांची पसंती ठरते आहे. ही आंबट-गोड, लालसर फळं बाजारात नजरेस पडतात आणि ग्राहक ती उचलण्यासाठी उत्सुक असतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ती भावते. वर्षातून एकदाच मिळणार्या या फळामुळे खरेदीसाठी विशेष गर्दी पाहायला मिळते.
यंदा भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे काश्मीरहून येणार्या चेरीच्या पुरवठ्यात उशीर झाला. त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला असून सध्या किरकोळ बाजारात चेरी 400 ते 600 रुपये किलो या दराने विकली जात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या दरात 50 ते 70 रुपयांची वाढ झाली आहे.
यंदा काश्मिरी चेरीची आवक उशिराने झाली. भारत-पाक संघर्षामुळे सुरुवातीला मालच कमी मिळाला होता. त्यामुळे दरात वाढ झाली. पण, जसजसा पुरवठा सुरळीत होऊ लागला, तसतशी बाजारात ग्राहकांची गर्दीही वाढत गेली. दरवाढ असूनही ग्राहक मागणी करतच आहेत. फक्त महिनाभरच मिळणार्या फळासाठी अशी गर्दी दरवर्षी होतेच.सुशीला साळुंखे, फळविक्रेता
दरवर्षी जूनमध्ये आम्ही चेरी विकत घेतो. यंदा किंमत वाढली आहे. पण चेरी फळ वर्षातून एकदाच मिळते, त्यामुळे आम्ही दरवर्षी घेतोच. सर्वात जास्त ती मुलांना आवडते, त्यासोबत घरचे ही आवडीने खातात.स्वाती जाधव, ग्राहक