Flat Fraud Dombivli Pudhari
ठाणे

Flat Fraud Dombivli: डोंबिवलीत एकाच फ्लॅटची दुसऱ्यांदा विक्री; बिल्डरकडून ग्राहकाची 20.15 लाखांची फसवणूक

या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: पश्चिम डोंबिवलीत एका बिल्डरने ग्राहकाला फ्लॅट विक्रीच्या नावाखाली तब्बल 20 लाख 15 हजार रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नोटरी करार करून पैसे उकळले, दुसऱ्या फ्लॅटचा ताबा दिला आणि अखेर तो फ्लॅटही दुसऱ्यालाच विकल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसायाने कार्पेंटर असलेले दीप्तीप्रसाद अजितकुमार अधिकारी (55) हे पश्चिम डोंबिवलीतील शास्त्रीनगर परिसरात असलेल्या ऐश्वर्या सीएचएसमध्ये राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आदित्य बिल्डकॉनचा बिल्डर प्रफुल मोहन गोरे (कार्यालय : शिवआराधना कॉम्प्लेक्स, सखाराम कॉम्प्लेक्स) याने 12 नोव्हेंबर 2023 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत हा प्रकार केला.

फिर्यादी दीप्तीप्रसाद यांनी शिवआराधना कॉम्प्लेक्समधील फ्लॅट क्र. 802 खरेदी करण्यासाठी सदर बिल्डरला 16 लाख 15 हजार रूपये दिले व नोटरी करारनामा केला. मात्र, बिल्डरने सदर फ्लॅट तयार न करता फिर्यादी दीप्तीप्रसाद यांना फ्लॅट क्र. 804 चा ताबा दिला.

फ्लॅट 804 च्या नोंदणीसाठी बिल्डरने ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैशांची मागणी केली. त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे सदर फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकला असल्याचे सांगून फिर्यादी दीप्तीप्रसाद यांची बोळवण केली.

विश्वास संपादन करण्यासाठी बिल्डरने 20 लाख रूपये परत देण्याचे आमिष दाखवून चेक दिला. प्रत्यक्षात फिर्यादी दीप्तीप्रसाद यांनी फ्लॅटसाठी दिलेले 16 लाख 15 हजार रुपये आणि फ्लॅटमध्ये केलेल्या फर्निचर, पीओपी, ग्रिल, पंखे, लाईट, पाण्याची टाकी व रिपेअरिंगसाठी खर्च केलेले 4 लाख रुपये, असे एकूण 20 लाख 15 हजार रूपये परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली.

या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 318 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोउनि आर. पी. पाटील अधिक तपास करत आहेत. कल्याण-डोंबिवलीतील रिअल इस्टेट क्षेत्रात एकाच फ्लॅटची दोन वेळा विक्री करण्याचे प्रकार वाढल्याने खरेदीदारांमध्ये भितीसह संतापाचे वातावरण पसरले आहे. ग्राहकांनी व्यवहार करताना कागदपत्रांची पूर्ण खात्री करूनच संबंधित बिल्डरला पैसे द्यावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT