डोंबिवली : पूर्वेकडील टाटा पॉवर लाईनखाली असलेल्या सद्गुरु ऑटो स्पेअर पार्टच्या गोदामाला गुरूवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदाम पूर्णत: भस्मसात झाले. जवळपास दोन-तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
डोंबिवलीच्या पूर्वेकडे असलेल्या टाटा पॉवर लाईनखाली येथे श्री माऊली प्रसन्न सोसायटीच्या तळमजल्यावर सद्गुरु ऑटो स्पेअर पार्टचे दुकान आहे. या दुकानाचे मागील बाजूस सोसायटीमध्ये स्पेअर पार्टचे गोदाम आहे. या गोदामात वाहनांसाठी लागणारे ऑईल व अन्य साहित्य ठेवण्यात आले होते. गुरूवारी सकाळी 11.30 च्या सुमारास दुकानात आग लागली. आग लागल्याने नागरिकांची एकच पळापळ झाली. आजूबाजूला असलेल्या दुकानदारांसह नागरिकांनी आग पसरू नये म्हणून त्वरित या दुकानातील लाकडी सामान बाहेर आणून ठेवले. मात्र दुकानाच्या पाठीमागे असलेल्या गोदामातील सामानाला आगीची झळ पोहोचली. त्यामुळे आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी जवान प्रयत्नांची शिकस्त करत होते. मात्र सामान ठेवण्याच्या खोलीत अडथळे असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून रामनगर पोलिसांनी इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून इमारत खाली केली. दोन-तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना अखेर यश आले. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी ही आग इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आला.