डोंबिवली : डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर कॉलेज परिसरात बुधवारी (दि. २९) मध्यरात्री एका भरधाव कारने मोठा थरार घडवला. नियम धाब्यावर बसवून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका निष्काळजी कार चालकाने दोन चारचाकी वाहनांना आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पेंढरकर कॉलेज परिसरातील रस्त्यावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तिने समोरून येणाऱ्या दोन गाड्यांना व एका प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनांचा चक्काचूर झाला आणि मोठा आवाज झाला. या आवाजामुळे परिसरातील रहिवाशांनी तात्काळ रस्त्यावर धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या दोघांना स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण पसरले होते.
डोंबिवली रेल्वे स्टेशन ते कल्याण-शिळ महामार्गाला जोडणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी आणि घाईगडबडीत पुढे जाण्यासाठी अनेक बेजबाबदार वाहनचालक थेट विरुद्ध दिशेने (राँग साईड) वाहने चालवण्याचा धोका पत्करतात. याच निष्काळजीपणामुळे हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मार्गावर नेहमीच अपघाताची टांगती तलवार असल्याने राँग साईडने जाणाऱ्या मुजोर चालकांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी तीव्र संतापजनक मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, या घटनेवर राजकीय वर्तुळातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी या प्रकारावर प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, "या भागातील दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे सामान्य वाहनचालक, पादचारी, नागरिक आणि कॉलेजचे विद्यार्थी प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यातच काही मुजोर चालक नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने गाड्या चालवतात, ज्यामुळे निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येत आहे. बुधवारी रात्री घडलेल्या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पोलिसांचा रस्त्यावर कोणताही वचक उरलेला नाही, हेच या घटनेवरून सिद्ध होते. पोलिसांनी केवळ पाहत न बसता वाहतूक कोंडीवर त्वरित ठोस उपाययोजना करावी आणि अशा टवाळ व मुजोर चालकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी."