ठाणे

Dombivli Accident : खाकी वर्दीतील ‘सुपरमॅन’! जीवाची पर्वा न करता GRP जवान शेळकेंनी मृत्यूच्या जबड्यातून वृद्धाला खेचले बाहेर

रणजित गायकवाड

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकावर शनिवारी (दि. २१) रात्री एक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. धावती लोकल पकडण्याच्या नादात एका ७० वर्षीय वयोवृद्ध प्रवाशाचा पाय घसरला आणि ते मृत्यूच्या दारात पोहोचले होते. मात्र, कर्तव्यावर तैनात असलेले जीआरपी (रेल्वे पोलीस) जवान अनिल शेळके हे त्यांच्यासाठी अक्षरशः 'देवदूत' ठरले. शेळके यांनी दाखवलेल्या अफाट प्रसंगावधान आणि चित्तथरारक तत्परतेमुळे या वृद्धाचा जीव वाचला असून, संभाव्य मोठी दुर्घटना टळली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

क्षणार्धात मृत्यूशी गाठ, पण...

मिळालेल्या माहितीनुसार, पंडित वाघ (वय ७० वर्षे) हे शनिवारी रात्री डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून प्रवास करत होते. यावेळी सुटलेली धावती लोकल पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, वयामुळे वेग न पेलवल्याने त्यांचा अचानक तोल गेला. ते चालत्या लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील अत्यंत धोकादायक फटीत खेचले जाणार, तोच काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

जवान अनिल शेळके यांची 'सुपरमॅन' एन्ट्री

पंडित वाघ हे फटीत पडत असल्याचे पाहताच, तिथेच सुरक्षेसाठी तैनात असलेले रेल्वे पोलीस जवान अनिल शेळके यांनी क्षणाचाही विलंब न करता बिबट्याच्या चपळाईने धाव घेतली. आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, शेळके यांनी धावत्या ट्रेनच्या दिशेने झेप घेतली आणि वयोवृद्ध पंडित वाघ यांना ताकदीने सुरक्षितपणे मागे खेचले.

जर जवान अनिल शेळके यांनी सेकंदाचा एक हजारावा भाग जरी उशीर केला असता, तर पंडित वाघ थेट रुळावर गेले असते आणि मोठा अनर्थ घडला असता. शेळके यांच्या या तत्परतेमुळे ७० वर्षीय वृद्धाला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

व्हिडिओ व्हायरल, शेळकेंवर कौतुकाचा वर्षाव

आपल्याला जीवनदान मिळाल्यानंतर भावूक झालेल्या पंडित वाघ यांनी रेल्वे पोलीस जवान अनिल शेळके यांचे डोळ्यात अश्रू आणून आभार मानले. दरम्यान, या थरारक वाचवावाचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. "खाकी वर्दीतील खरा हिरो", अशा शब्दांत नेटीझन्स आणि रेल्वे प्रवाशांकडून जवान अनिल शेळके यांच्या अंगावर काटा आणणाऱ्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT