Dombivli Local Train pudhari photo
ठाणे

Dombivli Local Train : दीड महिन्यात एकाही १५ डबा लोकल फेरीची भर नाही

मध्य रेल्वेची प्रवाशांना सावत्रपणाची वागणूक; प्लॅटफॉर्म विस्ताराची कामे वर्षभरानंतरही अर्धवट

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी १५ डबा लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची घोषणा करूनही गेल्या दीड महिन्यांपासून एकाही नवीन फेरीची भर पडलेली नाही, त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असल्याचा आरोप उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य तथा ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केला आहे.

मध्य रेल्वेने २० जुलैपासून १२ डबा लोकल रेकचे १५ डबा लोकलमध्ये परिवर्तन करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत सेक्शनवर १५ डबा लोकलच्या काही फेऱ्या सुरू केल्या होत्या. त्यानंतर २५ दिवसांनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनापासून दुसऱ्या एका १२ डबा लोकल रेकचे १५ डबा लोकलमध्ये परिवर्तन करून याच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत/खोपोली सेक्शनवर फेऱ्या सुरू करण्यात आल्या.

मात्र या फेऱ्यांच्या वेळापत्रकाचे वैशिष्ट्य म्हणजे सकाळी ऐन गर्दीच्या वेळात दादर ते कल्याणसारख्या प्रचंड गर्दीच्या सेक्शन ऐवजी १५ डबा लोकल सकाळचे तीन तास जेथे १२ डबा लोकल देखील अर्ध्याहून अधिक रिकाम्या धावतात, अशा कर्जत ते खोपोली दरम्यान फेऱ्या मारत असते. म्हणजेच या कालावधीत १५ डबा लोकलच्या २५ टक्के वाढीव प्रवासी क्षमतेचा वापरच होत नाही, त्यामुळे ही सेवा म्हणजे केवळ दिखावा असल्याची टीका ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यानचा स्लो कॉरिडॉर वगळता, मेनलाईनवरील सर्व स्टेशनांमधील सर्व प्लॅटफॉर्मचा १५ डबा लोकलसाठी लांबी विस्तार करण्याचे काम गेल्या वर्षी दिवाळीनंतर सुरू करण्यात आले होते. जवळपास वर्षभराचा कालावधी उलटूनही हे सर्व काम पूर्ण होऊन त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू होणे तर सोडाच, अजूनही अनेक ठिकाणी ही कामे अर्धवट अवस्थेत पडून असल्याचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कर्जत ते खोपोली दरम्यानच्या स्टेशनांमधील कामे पूर्ण झाली असली तरी त्याप्रमाणात १५ डब्यांच्या लोकल रेक्स अजून तयार झालेले नाहीत.

मध्यंतरी कल्याण ते टिटवाळा सेक्शनवर १५ डबा लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी दहा दिवसांचा महामेगाब्लॉक घेण्यात आला होता. पण कामे पूर्ण होऊनही प्रत्यक्ष १५ डबा लोकल फेऱ्यांची सुरुवात झाली नाही, त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. मध्य रेल्वेकडे सुरुवातीपासून १५ डबा लोकलचे दोन रेक्स आहेत.

त्यापैकी एक लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान दिवसभर फेऱ्या करीत आहे, तर दुसरा रेक सकाळी ६ वाजून १५ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटे अशा सव्वासहा तासात कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान काही फेऱ्या करून सायडिंग यार्डात थांबलेली असते. सध्याच्या फेऱ्या चालवण्यासाठी या लोकल रेकचा आता दिवसभर वापर करणे आवश्यक आहे. नंदकुमार देशमुख यांनी रेल्वेकडे पाठपुरावा करून प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT