ठाणे

Dombivali Crime : मुलाचा जीव वाचवण्यासाठी धावलेल्या वडिलांची लोखंडी रॉडने प्रहार करून हत्या

तीन महिलांसह चौघे ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवली जवळील घारीवली गावातील जाधववाडी परिसरात मंगळवारी रात्री रक्ताचा थरार पाहायला मिळाला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक राहूल जाधव यांच्या कुटुंबावर सशस्त्र जमावाने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात मुलाला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या बामा दूंदा जाधव (वय ६०) यांची लोखंडी रॉडने प्रहार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

काय घडले?

मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जाधव कुटुंबीय घरी जेवण करत असताना हा प्रकार घडला. राहुल यांचा भाऊ दिनेश याला साहिल जाधव नावाच्या तरुणाने फोन करून धमकावत घराबाहेर बोलावले. दिनेश बाहेर जाताच दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्याला बेदम मारहाण केली. फाटलेल्या कपड्यांनिशी दिनेश घरात पळत आला आणि त्याने आपली आपबिती सांगितली.

जाधव कुटुंबीय जाब विचारण्यासाठी घराबाहेर पडले असता, १४ जणांच्या सशस्त्र टोळीने त्यांच्यावर हल्ला चढवला. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ६० वर्षीय बामा जाधव पुढे सरसावले, मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने सपासप वार केले. बामा जाधव रक्ताच्या थारोळ्यात कोसळले असतानाही निर्दयी हल्लेखोर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारत होते. "आज एकाला मारले, उद्या तुम्हा सर्वांना मारू," अशी धमकी देत आरोपींनी तेथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जाधव यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तीन महिलांसह चौघे ताब्यात

या प्रकरणी राहुल जाधव यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत ३ महिला आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी मयूर पाटील आणि विनोद यांच्यासह इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिस छावणीचे स्वरूप

घटनेनंतर जाधववाडी आणि घारीवली परिसरात तणाव वाढल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरोपींची ओळख पटली असून लवकरच मुख्य सूत्रधारांना बेड्या ठोकल्या जातील." ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की इतर कोणत्या कारणावरून, याचा शोध पोलीस घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT