माऊली pudhari photo
ठाणे

माऊली

श्रद्धा केव्हा अंधश्रद्धा होते?

पुढारी वृत्तसेवा

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई

सोळाव्या अध्यायात आपण दैवासूर संपत्तीचा विचार केला. सद्गुण संपत्तीचा विचार हाच खरा आध्यात्मिक विचार. सद्गुणातच देव हा वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य. जे ठळकपणे साम्यभावावर स्थिरावत मानव्य जपण्याचं, विश्वात्मक स्वरुपाचं दर्शन घडवतं. दैवी संपदा ही सव्वीस गुणांनी बहरून येते. आसुरी संपदा फक्त सहा अवगुणांची पण ती मानव्यासह सृष्टीच्या विध्वंसास कारणीभूत ठरते. याविषयी नितांत सुंदर निरूपण आपण माऊली कृपेने गत अनेक लेखांत केलं. आजच्या लेखापासून आपण सतराव्या अध्यायाच्या चिंतनाला सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींना नतमस्तक होत सुरुवात करूयात.

॥ श्री ॥

‘श्रद्धात्रयविभाग योग‌’ म्हणजे श्री ज्ञानेश्वरीमधील सतरावा अध्याय. श्रद्धा ही तीन प्रकारची असते, यावर अत्यंत मूलभूत संशोधन करून या अध्यायात तत्त्वज्ञान विचार मांडलेला आहे. ‌‘श्रद्धा‌’ ही प्रत्येक मानवाठायी असलेला गुण. श्रद्धा कुठे ठेवलेली आहे, यावर तिचे स्वरूप अवलंबून असते. याविषयीचं अत्यंत गोड चिंतन माऊली या अध्यायात करणार आहेत. त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांनी श्रद्धेवर मांडलेल्या विचारांचं मंथन मी पुढील लेखांतून करणार आहे.

माऊंलीसारखा सद्गुरू तुम्हा - आम्हा मराठी जनांना लाभणे ही आमची अनेक जन्मांची पुण्याईच असणार यावर माझी ‌‘श्रद्धा‌’आहे. ज्या प्रमाणे पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीच्या काही ओव्यांतून माऊलीनी श्री गजाननाचं स्वरूप प्रगट केले आहे, अगदी त्याप्रमाणे या अध्यायाच्या सुरुवातीस माऊली श्री गणेशास स्तुतीसुमनांची शब्दमाला अर्पण करतात.

हे गजवदना, जे तुझ्या पारमार्थिक स्वरूपाविषयी अज्ञानी आहेस, त्यांच्याकरिता तू वक्रतुंड आणि ज्ञानीयांसाठी तुझी सोंड सरळ सन्मुख आहेस. माऊली गजाननाच्या सर्वांगाचं वर्णन करत, त्यांची सांगड जीवनातल्या अनेक तत्त्वांशी घालत, त्यांचा नम्रपणे आशीर्वाद मागतात. त्याचबरोबर आपल्या श्री गुरुचा म्हणजे श्री निवृत्तीनाथांचाही कृपाशीर्वाद निरूपणासाठी मिळावा म्हणून आग्रहपूर्वक त्यांना वंदन करतात.

जे तुझ्या विखी मूढ |

तयालागी तू वक्रतुंड|

ज्ञानियांसी तरी अखंड|

ऊजूची आहासी ॥

श्री गणेशास आणि श्री निवृत्तीनाथांना वंदन करून माऊली श्रीमद्भगवत्‌‍गीतेमधील सतराव्या अध्यायाचं निरूपण करण्यासाठी सिद्ध होतात.

Also read:माऊली

सोळाव्या अध्यायात आपण मानवी जीवनातील खरी संपत्ती कोणती याविषयी चिंतन केलं. दैवी संपदा आणि आसुरी संपदा या दोन्हींना संपत्तीची उपमा दिली आहे. सव्वीस प्रकारच्या दैवी संपदांना अंगीकारणं सोप्प नाही, सहा प्रकारच्या आसुरी संपदांना नाकारणं त्यापासून दूर राहणे हे ही सोप्पं नाही. एकाला स्वीकारण्यासाठी तर दुसऱ्याला नाकारण्यासाठी महत्प्रयासाने अभ्यास करावा लागेल. याविषयीचं यथार्थ तत्त्वचिंतन आपण गतअध्यायात सविस्तर झाल्यानंतर जिज्ञासू अर्जुनाच्या मनात जे प्रश्न निर्माण झाले, त्यावर आज आपण चिंतन करणार आहोत. सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीस अर्जुनाने अत्यंत सुंदर प्रश्न श्रीकृष्ण भगवंतास विचारले.

1. शास्त्रविधीनुसारच प्रत्येक कर्म करावे, यातून सुटका नाही.

2. शास्त्रात सांगितलेली सर्व कर्मे करण्याइतके आयुष्य कोणाकडे असते? शास्त्रांचे अनेक प्रकार आहेत, त्या सर्वांचा अभ्यास एवढ्या लहानशा आयुष्यात कसा होईल.

3. मोक्ष इच्छा बाळगणारा ‌‘मुमूक्षू‌’ याने परमार्थ कसा करावा?

4. शास्त्रविधी सोडून श्रद्धायुक्त अंतःकरणाने देवाचे जे लोक पूजन करतात त्यांची स्थिती कोणती होते?

5. शास्त्रकर्म करण्यासाठी योग्य स्थळ, पुरेसे आयुष्य, शास्त्रार्थ जाणणारे सद्गुरू, योग्य शास्त्र साहित्य, अनुकुल पूर्वकर्म; अनुकुल परिसर, समाज हे सर्व भेटत नाही.

6. शास्त्रांचा अभ्यास पेलवत नाही, शास्त्रात एकवाक्यता नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस केवळ परम श्रद्वेने भगवंतास शरण जात शिव, विष्णू, देवी याची पूजा करत भूमी-वस्त्रे- अलंकार - धन-धान्य यांचे महादान करतात. अग्नीहोत्र, चातुर्मास सर्वसामान्य जन श्रद्धायुक्त अंतःकरणाने करतात. या सर्व जनसामान्यांना या श्रद्धेचा लाभ कोणत्या प्रकारे होऊ शकतो?

Also read:माऊली

भगवंताची उपासना, सेवा करणाऱ्या प्रत्येक जिज्ञासू व्यक्तीच्या ठायी हे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पण, आश्चर्य म्हणजे जे भगवंत अस्तित्व मानत नाहीत. स्वतःला नास्तिक समजतात. त्यांच्या ठायी सुद्धा अंतःकरणापासून या प्रश्नाची निर्मिती होते. जीवाला हे प्रश्न भांडावून सोडणारेच आहेत. या सर्व प्रश्नाची उत्तरे श्री भगवान श्रीकृष्ण याच अध्यायात देणार आहेत, माऊली कृपेने आपण आजपासून त्याचंच यथार्थ तत्त्वचिंतन करणार आहोत.

ब्रह्मांड आणि त्यामधील सुक्ष्मातीत अणु-रेणू हे त्रिगुणांनी सुक्त आहेत. याविषयी आपण सविस्तर चिंतन चौदाव्या अध्यायात केले होते. मानवी देह हा पंचमहाभूतांपासून तयार झाला आहे. हा देह देखील त्रिगुणांनी युक्त असतो. क्षणाक्षणाला अगदी रात्रंदिवस, श्वासाश्वासाला आपण त्रिगुणांनी भारांकीत असतो. प्रत्येक जीव हा ज्याप्रमाणे निर्गुणांनी भारांकीत असतो, त्याप्रमाणेे तो त्याच्या स्वाभाविक श्रद्धेसह जगत असतो. अगदी श्रद्धाही तीन गुणांना निगडीत राहून साहचर्याने जीवन जगत असते. त्यामुळे कोणाची श्रद्धा-राजस तर कोणाची तामस आणि काहींची सात्विक श्रद्धा तुम्हा-आम्हाला पाहायला मिळते.

यामध्येही आणखी एक गंमत आहे. ज्या प्रमाणे मानवी जीवनाचा क्षणाक्षणाला भरोसा नसतो, त्याप्रमाणे श्रद्धाही तितकीच चंचल स्वरूप धारण करते. रज-तम-सत्व या गुणांपैकी कोणता गुण त्या क्षणाला वर्चस्व गाजवतो आहे, तशी तुमची श्रद्धा ही बदलत जाते. याचाच सहज सोपा आणि सरळ अर्थ शरीरात असलेल्या तीन गुणांपैकी कोणतेही दोन गुण जेव्हा क्षीण होतात, तेव्हा एका गुणाचा उत्कर्ष (वाढ) होतो. ज्या गुणाचा उत्कर्ष झालेला असतो त्या गुणानुसार वृत्ती आणि विचार निर्माण होतात.

तेथेही दोन गुण खांचती | मग एक घरी उन्नती|

तै तैसीयाचि होती वृत्ती | जीवाचिया ॥

श्रद्धा केव्हा अंधश्रद्धा होईल आणि श्रद्धेच्या नावाखाली कोण सर्वसामान्यांना भूलवून अंधश्रद्धेच्या दरीत ढकलून देईल, हे भल्याभल्यांना सांगता येणे कठीण आहे ते याचमुळे. अंधश्रद्धेला कधी स्वार्थ चिटकेल आणि रज-तमाचा त्या श्रद्धेेस गंध लागेल हे जेव्हा कळत नाही, तेव्हा भली-भली माणसे वाया जातात. अज्ञानाच्या अंधारकोठडीत अंधश्रद्धेच्या काठीनं त्यांना लोटले जाते. याच कारणांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.

जगभरात सातत्याने वर्षानुवर्ष आणि युगानं युग मानवजात श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला कवटाळत आलेली आहे आणि पुढेही ती याचप्रमाणे वाहत जाणार. सर्वसामान्यांना अंधश्रद्धेपासून दूर होत श्रद्धेच्या विस्तीर्ण कल्पवृक्षाखाली नितांत सुंदर सावलीखाली जीवन जगायचं असेल; तर ज्ञानेश्वरीसारखं तत्त्वचिंतन करायलाच हवं.

श्रद्धावान असणं आणि सात्विक श्रद्धेच्या आधारावर जीवन जगणं याचा माऊलींनी खूप सखोल अभ्यास केला आहे. ज्ञानाची ही अमूल्य देणगी श्री ज्ञानेश्वरीच्या स्वरूपात तुमच्या-माझ्या मस्तकावर वरदहस्त आहे, त्याचाच आपण दर आठवड्यात या सदरच्या रूपाने आस्वाद घेत आहोत.

रामकृष्णहरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT