किन्हवली (ठाणे) : संतोष दवणे
रताळे, गोदरे, करांदे, अलकुंद्रे अशा कंदमुळांचा चविष्ट फराळ, चिवरांच्या टिवल्या, शेणाचे प्रतिकात्मक गुराखी, गुराढोरांची सजावट व पूजा अशा पारंपरिक थाटात आठवडाभर चालणारी शहापूरकरांची दिवाळी शुक्रवारी वसुबारसच्या मुहूर्तावर सुरु झाली. बलिप्रतिपदेला गावागावात गुराढोरांना सजवून त्यांना पेटत्या आगीवरुन उडवण्याचा व लास देण्याचा उत्सव साजरा करण्यासाठी शेतकरी सज्ज झाले असून शेतात तयार झालेले भात खळ्यात आणून टाकल्याने प्रत्येक शेतकरी कुटुंबात आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
शुक्रवारी (दि.१७) वसूबारसपासून शहापूरच्या ग्रामीण भागात दारोदारी गोल रानकाकडी किंवा शेंदरीपासून बनवलेल्या चिवरांच्या टिवल्या (पणत्या) लावायला सुरुवात झाली आहे. शुक्रवार (दि. १७) ते गुरुवार (दि.२३) म्हणजेच भाऊबीजेपर्यंत एक आठवडाभर हा दिवाळसण साजरा होणार असून सुट्टीचा आनंद लुटणारी बच्चेकंपनी करंजी, शंकरपाळी, चिवडा, चकली, बेसणलाडू आणि मिठाईचा आस्वाद घेत मातीचे किल्ले बनवण्यात रममाण झालेली दिसून येत आहे. बलिप्रतिपदा किंवा दिवाळी पाडवा हा शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा मुख्य दिवस असून यादिवशी शेतकरी आपल्या गुरांना स्वच्छ धुतात, गेरूचा रंग व बाजारातून आणलेल्या विविध रंगांचे ठसे गुरांच्या अंगावर उमटवतात, सूप वाजवून त्यांना ओवाळतात व नैवैद्य चारून त्यांना गावाच्या वेशीपाशी पेटवलेल्या अग्नीवरुन उडी मारायला लावतात.
यालाच लास देणे असे म्हणतात. शहापूरची ही प्राचीन परंपरा मानली जाते. शेणाचे गुराखी, पिठाचा बैलराजा, कडूनिंबाचा काढा आणि रताळे गोदरे करांदे-अलकुंद्रे-चवळीचे दाणे यांचा चवदार फराळ अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबींसाठी शहापूरची ग्रामीण दिवाळी ओळखली जाते. आठ दिवस अगोदरपासूनच अंगणात राखुंडीपासून नरकासुराचे चित्र रेखाटून आठविंदे साजरे करण्याची पद्धत काही गावांत दिसून येते. गोलाकार रानकाकडीचे दोन तुकडे करून त्यातील बिया काढून टाकल्या जातात व धुवून सुकवलेल्या या टिवल्यांमध्ये तेल टाकून दिवे पेटवले जातात. विशेष करुन लक्ष्मीपूजनाच्या रात्री जास्तीत जास्त दिवे लावून परिसर प्रकाशाने उजळवून टाकला जातो. रात्री भुईचक-या, फुलबाजे, भुईनळ्या, पाऊस, सुरसु-या, रंगीत फटाके यांच्या आतषबाजीचा खेळ उशिरापर्यंत रंगात येतो. बलिप्रतिपदेच्या दिवशी भल्या पहाटेच घरातील मुले-माणसे उठून अभ्यंगस्नान करतात व गोठ्यातील गाईगुरांना सजवतात. वर्षभर कुटुंबासह आपल्या गुरांनाही आरोग्य लाभावे यासाठी लक्ष्मीनारायणाला साकडे घातले जाते.
गावाकडच्या साध्या माणसांसाठी नाती उजळवून टाकणारा उत्सव दिवाळीत गोड पदार्थांची लज्जत चाखल्यानंतर घरातील सर्वांना कडुनिंबाचा कडू रस दिला जातो आणि शरीरात अतिरिक्त साखर वाढू नये म्हणून आरोग्याचीच जणू काळजी घेतली जाते. सणाच्या निमीत्ताने शेजारीपाजारी, भाऊबंद, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांना फराळासाठी बोलावून स्नेह वृद्धिंगत केला जातो. त्यामुळेच हा दिव्यांचा सण गावाकडच्या साध्या माणसांसाठी नाती उजळवून टाकणारा उत्सव बनल्याचे दिसून येते.
पारंपरिक बाज; कमळाच्या फुलांना विशेष महत्त्व
घरोघरी तांदळाच्या पिठापासून बैलराजा बनवून बळीराजाची प्रतिकात्मक पूजा केली जाते व ते बैल तांदळाच्या कोठीत ठेवले जातात. याच दिवशी शेतकरी रानात जावून भुतूकसा, लिखरा, रानखुरासणी, आवळा इत्यादी वनस्पतींच्या फांद्या आणून घराच्या वळचणीला खोचून ठेवतात. या दिवशी कमळाच्या फुलांना विशेष महत्त्व दिले जात असल्याने आदिवासी लोक मोठ्या प्रमाणात गावतलावात कमळाची फुले काढण्यासाठी उतरतात. अंगणात शेणापासून बनवलेल्या गुराख्याच्या डोक्यावर घोंगडी व हातात काठी देण्याची व आजूबाजूला शेणाचीच गुरे दाखवण्याची आगळीवेगळी परंपरा बऱ्याच गावांत आजही जोपासली जात आहे.