ठाणे: दिवा परिसरात एका बोगस डॉक्टरने १२ वर्षांच्या निष्पाप मुलांचा बळी घेतला असल्याची घटना उघडकीस आली आहे. देवेंद्र सिंग असे मुलाचे नाव असून चुकीच्या उपचारांमुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हा बोगस डॉक्टर दिव्यात बंगाली बाबा म्हणून प्रसिद्ध होता. धक्कादायक बाब म्हणजे त्या बंगाली बाबाने श्लोक नगर येथील शिंदे गटाच्या कार्यालयात आपले बस्तान मांडले होते. तिथूनच तो रुग्णांवर उपचारदेखील करत होता. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस डॉक्टर शिशिर राय याने देवेंद्र सिंगला एक औषध दिले. या औषधानंतर काही मिनिटांतच मुलाची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने डोंबिवली त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १ जूनला देवेंद्रचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बोगस डॉक्टर शिशिर राय पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून, दिव्यातील बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.