उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये एका दिव्यांग प्लंबरला काम देण्याच्या बहाण्याने बोलावून त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगलो परिसरात घडलेल्या या पूर्वनियोजित हल्ल्यात प्लंबर गंभीर जखमी झाला असून, तीन अज्ञात हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, उल्हासनगर कॅम्प ५ मधील सह्याद्री नगर येथे राहणारे पप्पूसिंग बलवंतसिंग राठोड हे प्लंबिंगचे काम करतात. २५ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर कॉल आला. समोरच्या व्यक्तीने प्लंबिंगचे काम असल्याचे सांगून त्यांना बंगलो परिसरात बोलावले. कामाची संधी म्हणून पप्पूसिंग आपल्या मुलासह ॲक्टिव्हावरून ठरलेल्या ठिकाणी पोहोचले.
मात्र, तिथे पोहोचताच तीन मोटरसायकलवरून आलेल्या तरुणांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. काही कळण्याच्या आतच एका हल्लेखोराने लाकडी दांडक्याने पप्पूसिंग यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. हल्ल्यानंतर आरोपी भरधाव वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. पप्पूसिंग यांच्या मुलाने धाडस दाखवत हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पप्पूसिंग यांना तातडीने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विठ्ठलवाडी पोलिसांनी याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.