‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेला 48 लाखांचा गंडा pudhari photo
ठाणे

Digital arrest scam : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून वृद्ध महिलेला 48 लाखांचा गंडा

नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरारोड : टेलिकॉम विभागाचा अधिकारी आणि पोलीस असल्याचे भासवून एका सायबर भामट्याने मिरारोडमधील एका 60 वर्षीय महिलेला तब्बल 48 लाख 29 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ही मोठी लूट करण्यात आली असून, याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड येथील शांतीनगर सेक्टर 10 परिसरात राहणाऱ्या शोभा वासुदेव नायक (60) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 13 मार्च 2026 ते 5 एप्रिल 2026 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. सुरुवातीला शोभा यांचे पती वासुदेव नायक यांच्या मोबाईलवर आकाश शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण दिल्ली येथील दूरसंचार विभागातून बोलत असल्याचे सांगितले.

भामट्याने नायक दाम्पत्याला चॅटिंग ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. या ॲपवरून व्हिडिओ कॉल करताना आरोपीने चक्क पोलिसांचा गणवेश परिधान केला होता, जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तो खरा पोलीस अधिकारी वाटेल. त्याने तुम्ही नरेश गोईल याच्या गुन्ह्यात संशयित आहात, असे सांगून नायक दाम्पत्यावर दबाव टाकला.

तपासाच्या आणि पोलीस चौकशीच्या नावाखाली आरोपीने या दाम्पत्याच्या संपत्तीची सर्व माहिती काढून घेतली. अटक करण्याची भीती दाखवून त्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. घाबरलेल्या शोभा नायक यांनी आरोपीने दिलेल्या विविध बँक खात्यांवर 48 लाख 29 हजार आरटीजीएसद्वारे वर्ग केले.

पैसे दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शोभा नायक यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी आकाश शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक समीर अहीरराव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT