सापाड : योगेश गोडे
विवाह संस्कृतीतील ‘धवलारीन’ लुप्त होण्याच्या मार्गावर असून आधुनिकतेच्या ओघात पारंपरिक संस्कृतीचा विसर पडत चालल्याचे दिसून येत आहे. धवलारीन ही ओळख केवळ त्यांच्या मेहनती जीवनशैलीपुरती मर्यादित नसून, समृद्ध संस्कृती, रूढी-परंपरा आणि संस्कारांनी नटलेल्या सामाजिक रचनेतून दिसून येते.
विशेषतः लग्नसमारंभ हा दोन व्यक्तींचा विवाह नसून, तो दोन कुटुंबांमधील, देव-देवतांच्या साक्षीने पार पडणारा सांस्कृतिक उत्सव असतो. या विवाहसंस्कृतीचा आत्मा म्हणजे ‘धवलारीन.’ मात्र, आधुनिकतेच्या झंजावातात ही परंपरा आता हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
विवाहविधीत धवलारीनचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. लग्नातील प्रत्येक विधीकुलदैवत पूजन, देव-देवब्राम्हणांची साक्ष, हळदीचा कार्यक्रम, तांदळाचा विधी, वर-वधूच्या प्रवेशापासून ते मुख्य लग्नविधीपर्यंतहे सर्व पारंपरिक चालीरीतीनुसार पार पाडण्याची जबाबदारी धवलारीन सांभाळत असते. धवलारीन ही केवळ विधी सांगणारी व्यक्ती नसून, ती पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या मौखिक परंपरेची जिवंत साखळी आहे.
मंत्र, ओव्या, पारंपरिक गाणी, विधींचा क्रम आणि त्यामागील श्रद्धा हे सर्व तिच्या स्मरणशक्तीवर आणि अनुभवावर आधारित असते. पारंपरिक लग्न समारंभामध्ये साधारणतः तीन दिवस कार्यक्रम चालतो. या तीनही दिवसांत धवलारीन पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत उपस्थित राहून सर्व विधी निर्विघ्नपणे पार पाडते. तिचा पोशाख पारंपरिक धवला गात, डोक्यावर पदर, हातात तांदूळ ही वेशभूषा नसून संस्कृतीचे प्रतीक आहे.
मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे, आजच्या काळात जिथे एका तासाच्या मेकअपसाठी लाखो रुपये खर्च केले जातात, तिथे तीन दिवस संपूर्ण लग्नसमारंभ सांभाळणाऱ्या धवलारीनला पाच हजार रुपये देण्यासही अनेक कुटुंबे तयार नसतात. परिणामी, ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने घटत चालली आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि ‘शॉर्टकट’ संस्कृती याचा परिणाम विवाह पद्धतीवरही दिसून येत आहे.
आज अनेक ठिकाणी पारंपरिक धवलारीनच्या ऐवजी रेकॉर्डेड साऊंड, मोबाईल ॲप्स किंवा डीजेवर लावलेले विधीचे आवाज वापरले जात आहेत. यामुळे विधी यांत्रिक होत असून, त्यातील भावनिक, सांस्कृतिक आणि धार्मिक गांभीर्य कमी होत चालले आहे. पूर्वी धवलारीन होण्यासाठी विशेष मान होता. आजी-आजोबा, आईकडून मुलीकडे ही परंपरा हस्तांतरित होत असे. मात्र आजची नवी पिढी या कामाकडे आर्थिक दृष्टिकोनातून पाहत आहे.
कमी मोबदला, वाढती कामाची जबाबदारी आणि सामाजिक प्रतिष्ठेचा अभाव यामुळे तरुण महिलांमध्ये धवलारीन बनण्याची इच्छा राहिलेली नाही. आज प्रश्न असा उभा राहतो आहे की, आपण केवळ झगमगाट, मेकअप, फोटोग्राफी आणि डेकोरेशनवर लक्ष केंद्रित करणार की आपल्या मुळाशी असलेल्या परंपरेला जपणार? आगरी समाजाची ओळख टिकवायची असेल, तर धवलारीनसारख्या परंपरांना भावनिक नव्हे, तर व्यावहारिक आधार देणे काळाची गरज आहे.
धवलारीन ही विवाह संस्कृतीतील आत्मा आहे. तिच्या अस्तित्वावरच या समाजाची सांस्कृतिक ओळख टिकून आहे. आधुनिकतेशी जुळवून घेताना परंपरेचा गळा दाबला गेला, तर येणाऱ्या पिढ्यांना आपल्या मूळ संस्कृतीचा ठेवा छायाचित्रे आणि रेकॉर्डरच्या आवाजातच अनुभवावा लागेल. त्यामुळे “धवलारीन वाचवा, परंपरा वाचवा” हा आधुनिक युगात सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.
आम्ही श्रद्धेने हे काम केले. पण आजची पिढी विचारते यातून मिळणार काय? जेव्हा तीन दिवस राबूनही योग्य सन्मान आणि मोबदला मिळत नाही, तेव्हा कोणीही पुढे येणार नाही. लग्न समारंभात रेकॉर्डरवरून गीते लावणे सोयीचे वाटत असले, तरी त्यातून परंपरेचा आत्मा हरवला जात आहे. धवलारीन नुसती आवाज नसून, ती परिस्थितीनुसार विधी समजावून सांगणारी, चुका दुरुस्त करणारी आणि कुटुंबाला भावनिक आधार देणारी व्यक्ती असते. त्यामुळे धवलारीन जिवंत राहिली तर आगरी समाजातील रुढी परंपरा जिवंत राहतील.अवनी पाटील, सिव्हिल इंजिनियर धवलारीन
संस्कृती जपण्यासाठी वेळीच पावले उचलली नाहीत, तर येत्या काही वर्षांत लग्नसमारंभात धवलारीन मिळणे अशक्य होईल, आणि आगरी रूढी परंपरा पुस्तकांतच उरेल. त्यामुळे धवलारीनच्या मोबदल्याबाबत एक सुस्पष्ट मानधन, समाजपातळीवर सन्मान, प्रशिक्षण व्यवस्था आणि तरुण पिढीसाठी प्रोत्साहन योजना राबवण्याची गरज आहे.रमाकांत म्हात्रे, समाजातील जाणकार