उल्हासनगर जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी अखेर भाजपात प्रवेश केला  Pudhari
ठाणे

Ulhasnagar Politics | उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का: जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पुढारी वृत्तसेवा

Shiv Sena UBT Dhananjay Bodare Join BJP

उल्हासनगर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते व उल्हासनगर जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी अखेर भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात सुरू होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

उल्हासनगर महापालिकेच्या राजकारणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेला हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी उल्हासनगर महापालिकेचे सभागृह नेते, माजी उपमहापौर तथा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, माजी नगरसेविका वसुधा बोडारे, तसेच ओमी कलानी गटातील नाना बिराडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. ठाकरे गटासह ओमी कलानी गटातून झालेल्या या प्रवेशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्षाच्या वतीने नव्याने प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांचे स्वागत करण्यात आले.

भाजपात प्रवेश करताना धनंजय बोडारे म्हणाले, “संपूर्ण देशात विकासाचे वारे वाहत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी विकासाची गंगा पुढे नेत आहे. विकासाकडे वाटचाल करणाऱ्या या प्रवाहात सहभागी होऊन उल्हासनगरचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने मी माझ्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला आहे.

ते पुढे म्हणाले, “उल्हासनगरला ‘सिंगापूर करणार’ असे अनेक वर्षांपासून फक्त नावापुरते ऐकायला मिळाले. आता तरी हे शहर चांगले, विकसित आणि नागरिकांच्या अपेक्षांना पूरक व्हावे, यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू. उल्हासनगरकरांना अपेक्षित असलेले शहर घडविण्याचे वचन मी देतो.” या पक्षप्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता असून स्थानिक राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT