डोंबिवली : नवी दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या तीव्र पडसाद थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत उमटले आहेत. केडीएमसीच्या महासभेत या मुद्द्यावरून विरोधकांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या पक्षानेही आक्रमक भूमिका घेतल्याने सत्ताधारी महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे. विशेष म्हणजे एरवी एकमेकांचे हाडवैरी मानले जाणारे ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक या आंदोलनाच्या निमित्ताने सभागृहात एकत्र आले होते, ज्यामुळे केडीएमसीच्या राजकारणात तुफान गदारोळ उडाला होता.
गुरूवारी दुपारी केडीएमसी महासभेचे कामकाज सुरू होताच दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट आणि मनसेच्या नगरसेवकांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत विरोधकांनी महासभा तातडीने तहकूब करण्याची मागणी लावून धरली. गोंधळ वाढल्याने महापौरांनी सुरूवातीला कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले. मात्र पुन्हा कामकाज सुरू होताच आंदोलन अधिक तीव्र झाले. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाच्या नगरसेवकांनी वंदे मातरम् आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरूवात केल्याने सभागृहात दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी झाली. अखेर महापौरांनी महत्त्वाचे विषय मंजूर करून घेत सभा तहकूब केली.
मनसेने सत्तेतून पडण्याचा भाजपाचा सल्ला
या गदारोळानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाचे नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी मनसेच्या या भूमिकेवर कडक शब्दांत टीका केली. एकीकडे सत्तेत मलाई खायची आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांविरोधातच आंदोलन करायचे, ही दुटप्पी भूमिका आता चालणार नाही. मनसेला आंदोलन करायचे असेल तर त्यांनी आधी सत्तेतून बाहेर पडावे, असा थेट इशारा दीपेश म्हात्रे यांनी दिला.
मनसेचे सडेतोड उत्तर
भाजपाच्या या थेट आव्हानाला मनसेचे गटनेते प्रल्हाद म्हात्रे यांनीही तितक्याच आक्रमकतेने प्रत्युत्तर दिले. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा अत्यंत अन्यायकारक असून त्याचा निषेध नोंदविणे आमचे कर्तव्य होते. हा मुद्दा सत्तेचा किंवा राजकारणाचा नसून थेट देशाच्या भवितव्याचा आणि विद्यार्थ्यांच्या हक्काचा आहे, त्यामुळे आमची भूमिका अगदी स्पष्ट असल्याचे त्यांनी बजावले.
आंदोलनाला पूर्वपरवानगी नव्हती
युतीतील या वादानंतर केडीएमसीच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत मध्यस्थीचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गट आणि मनसेने या आंदोलनासाठी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती, अचानक अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य नव्हते असे त्या म्हणाल्या. मात्र सत्तेतील अस्तित्वाबाबत बोलताना, मनसे आमच्यासोबत महायुतीत सत्तेत आहे आणि पुढेही कायम राहील, असे स्पष्ट करत त्यांनी भाजपाच्या मागणीतील हवा काढून घेतली. विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून पेटलेला हा वाद आता स्थानिक राजकारणात चांगलाच तापला आहे.
कल्याणमध्ये रास्ता रोकोसह पुतळा दहन
दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी रास्ता रोको करत केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचे दहन केले. या आंदोलनामुळे काही काळ कल्याण शहरातील वाहतूक ठप्प झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी देखिल सहभागी झाले होते.