कृष्णा जाधव : मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई
गुण कर्मानुसार चित्तवृत्ती निर्माण होते. मानवी जीवनात त्याची वर्तणूक किती महत्त्वाची आहे !!! क्षणांक्षणाला मानवाच्या हातून घडणारी कर्म त्याच्या अंगी असलेल्या रज-तम-सत्व गुणांचा परिपाक आहे. या तीन गुणांपैकी आपण कोणाचा अंगीकार करतो? हे कोणाच्या हातात आहे? जर तुमच्या-आमच्या हातात गुणांचा स्वीकार असेल तर मग दोष कोणाला देता? भगवंत सर्वत्र आहे. तसा जीवाच्या ठायी असलेल्या अहंकारात आहे. अहंचा परिचय हाच आत्मज्ञानास कारणीभूत तरीही त्यासाठी भगवंत कृपा हवीच हवी. ती सद्गुरुकृपाशीर्वादानेच लाभते, याविषयी चिंतन आपण गतलेखात केलं. आजच्या लेखात देहाला; आत्मा; मानणाऱ्याविषयीचे चिंतन.
॥ श्री ॥
मानवी देहाचं शास्त्रशुद्ध चिंतन भरत खंडात विविध तत्त्वविचार मंथनातून घडले आहे. जगाच्या पाठीवर मानवी देह आणि त्यामधील इंद्रियांच एवढं सुक्ष्म चिंतन क्वचितच पाहावयास मिळेल. असो, आपण आज देह अहंकाराचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मानवी शरीर हे भगवंताने दिलेला ‘प्रसाद’ आहे की, केलेला ‘प्रमाद’ आहे ? याविषयी ज्याचा त्यांनी निर्णय करावा. हा नरदेह दुर्लभ; त्यातल्या त्यात देह अव्यंग प्राप्त होणं हे भगवंताची कृपा. भगवंत जन्म देत नाही आई-बाप जन्म देतात !!! असे म्हणणारे देखील पुष्कळ भेटतील. विचारमंथनात कोणाला कमी लेखूही नये. या शरीराबद्दलचा ज्याचा त्याचा स्वतंत्र विचार असावा यात दुमत असण्याचे काही कारणही नाही. तथापि श्रीकृष्णाने मांडलेल्या विचाराचं खंडण करण्याअगोदर तो विचार काय आहे? हे समजून घ्यायला काय हरकत आहे?
देह आणि आत्मा या दोन बाबी स्वतंत्र आहेत. याविषयी आज आपण चिंतन करत आहोत. देह ‘अहंकारात’ बुडणारे जीव देहालाच आत्मा मानतात. आणि मग हाच देह अहंकार ‘मी’ पणाचं अस्तित्व दाखवत मरेपर्यंत स्वतःला, स्वतःचा परिचय देखील घडू देत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास देह आणि इंद्रिये यांची इच्छा (कामेच्छा) भागवण्यात संपूण जातो. देहाला सजवण्यात, त्यावर वस्त्रं, आभूषणं, अलंकार घालून त्याचं प्रदर्शन करण्यात, मी सर्व जगापेक्षा वेगळा आहे हे दाखवण्यात जीवन-आयुष्य कामी येते, की वाया जाते? घर-दार, जमीन-जुमला, सत्ता-संपत्ती, प्रतिष्ठा-वैभव, भोग-विलास (ही यादी न संपणारी) यासारख्या गोष्टी मागे धावत धावत स्वतःच्या अस्तित्वाचा आपणास विसर पडतो. म्हणजे जीवन जगताना हे सर्व नकोच आहे, असा टोकाचा अर्थ काही लोक काढू शकतात. इथे बुद्धीचा भाग महत्त्वाचा आहे. भगवंताने शरीर-इंद्रिय-सृष्टी निर्माण केली आहे, ती उपभोगण्यासाठीच आहे. परंतु तो उपभोग अष्टांगयोग मार्गाद्वारे घ्यावा. शरीर भोगाशिवाय सुद्धा जीवन आहे ही जाणीव आध्यात्मशास्त्र तत्त्वज्ञान निर्माण करून देतं.
श्रीकृष्ण पंधराव्या अध्यायाच्या चिंतनात हे ही सांगतात की जीवाचं भगवंताविषयीच अज्ञान आणि विषयात रमून भगवंत स्मरणाच विस्मरण हे ही त्याच्याच सत्तेने घडते. मानवी जीवनातलं संचित हेच भगवंताला ओढून आणू शकत, स्वतःकडे. अन्यथा ज्ञान आणि अज्ञान हे मानवाच्या अधीन नाहीच नाही. निद्रा किंवा जागृती या दोन्ही अवस्थेला ज्ञानच कारणीभूत आहे, त्याप्रमाणे ज्ञानी अथवा अज्ञानी अशा जीवाच्या अवस्थेस भगवंतच कारणीभूत आहे.
एवं निद्रा का जागणिया|
प्रबोधुचि हेतु धनंजया|
तेवि ज्ञान अज्ञाना जीवा जीवाचियां| मिची मूळ॥
भगवंत हेच ज्ञान आणि अज्ञान वाढीसाठी सर्वकाळ अधिष्ठान आहेत. ब्रह्मस्वरूपाचा बोध होण्यासाठी देखील तेच कारणीभूत आहेत. वेद आणि शास्त्र यांचा विस्तार भगवंत जाणून घेण्यासाठीच झाला, त्याला कारणीभूतही भगवंतच आहेत. एवढेच काय? भगवंत द्वैत आणि अद्वैतास जाणण्यासाठी भगवंत कृपादृष्टीच लागते आणि ती त्यालाच लाभते ज्याच्यावर गुरुकृपा आहे. माऊली म्हणतात.
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे|
सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे॥
भगवंत भक्तिस्वरुपात द्वैत रूपाने प्रगटतो आणि मुक्तीच्यावेळी अद्वैतात आलिंगन देतो. संत तुकाराम महाराज म्हणतात,
देव पहायास गेलो|
तेथे देवची होवोनि आलो|
भक्तीयुक्त अंतःकरणाने, भक्तीरसात बुडालेले तुकोबा केव्हा अद्वैतात जातात हे त्यांच्या अभंगातून कळते. एवढंच काय तर ते देह देवाचे देवुळ| आत बाहेर निर्मळ असेही म्हणतात. भगवंत भक्तीसाठी आणि त्याच्या प्राप्तीसाठी शेवटी त्याचीच कृपा लागते. संताचे भगवंत भक्तीचे आणि त्याच्या कृपेचे अनुभव त्यांच्या रचनांमधून सामोरे येतात.
संपूर्ण अविद्या नाहीसे करणारे अज्ञान जे ज्ञान, ते जेव्हा अद्वैत ब्रह्मस्वरूपात बुडून जाते त्यावेळी ते ‘नाही’ असे म्हणता येत नाही व ‘आहे’ असेही म्हणता येत नाही. जिथे भगवंत किंवा ब्रह्म भेटते तिथे आहे रे !! आणि नाही रे !! हा द्वैत आणि अद्वैत वादही संपतो !!!
मग आगी लागलीया कापूरा|
ना काजळी ना वैश्वानरा|
उरणे नाही वीरा| जयापरी ॥
देह अहंकाराला सोडण्यासाठी भगवंत इच्छा ही महत्त्वाची, केवळ त्याच्या इच्छेनेच अध्यात्ममार्ग हाती येतो. केवढं हे आपलं भाग्य !!!
रामकृष्णहरी