मीरा रोड : मीरा भाईंदर शहरात गेल्या काही वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे काम सुरू असताना रस्त्यामध्येच डेब्रिज, इतर साहित्य व रस्त्यात पडलेल्या खड्ड्याकडे मेट्रो ठेकेदार, एमएमआरडीए व महापालिका अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचे नेहमी अपघात होत आहेत. रविवारी दिवाळीच्या दिवशीच भाईंदर येथे एका दुचाकीचा अपघात झाल्याने एका दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिरा भाईंदर शहरात दहिसर चेकनाका ते भाईंदर पश्चिम या भागात गेल्या काही वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात झाले असुन या अपघातात काही नागरीकांचा बळी गेला आहे तर काही नागरीक जखमी झाले आहेत. मेट्रो ठेकेदाराच्या व प्रशासकीय अधिकार्यांच्या निष्काळजीपणामुळे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामकाजामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
काशीमीरा नाका ते भाईंदर पर्यंत रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी अनेक तक्रारी केल्या आहेत. तसेच लोकप्रतिनिधी हे बैठका घेवून नागरिकांना फक्त आश्वासने देत आहेत. लोकप्रतिनिधींच्या आदेशाला मेट्रो ठेकेदार कचर्याची टोपली दाखवत आहे. तर अधिकार्यांना तर काडीची देखील किँमत देत नसल्याचे दिसून येत आहे. मेट्रोच्या कामाचे राडा रोडा, लोखंडी अँगल व ईतर साहित्य हे रस्त्यामध्येच टाकलेले असते. त्यासाठी कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली जात नाही. काम सुरू असताना वरून अनेक वाहन चालकांच्या अंगावर अवजड वस्तू पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. रस्त्यामध्ये खड्डे पडल्यामुळे मोठया प्रमाणात धूळ उडत आहे. तसेच प्रवाशी, वाहनचालक यांचे अपघात होत आहेत. नागरीकांच्या मनके, पाठदुखी व ईतर आजार उद्भवत आहेत.
देशभर दिवाळीचा उत्सव सुरू असताना रविवारी एक दाम्पत्य लहान मुलांसह दुचाकीवरुन भाईंदर येथे जात होते. गोल्डन नेस्ट येथे रस्त्यांवर खड्डे व डेब्रिज टाकल्यामुळे त्यांची दुचाकी घसरली सकाळी अकराच्या सुमारास घसरली. या भीषण अपघातात पाठीमागून येणार्या बेस्ट बसच्या चाकाखाली दुचाकीवरील दोन वर्षांच्या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली आहे.