डोंबिवली : पुढारी आणि वाचकांचे अतिशय जवळचे नाते आहे. त्यामुळेच पुढारीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला कल्याण-डोंबिवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गेल्या 86 वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून वाटचाल करणाऱ्या पुढारीने ग्रामीण भागासह शहरी भागातही वाचकांच्या मनावर ठसा उमटविला असल्याचे गौरवोद्गार डीसीपी अतुल झेंडे यांनी शुक्रवारी (दि.31) बोलताना काढले.
दैनिक पुढारीच्या 86 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांना त्याच्या कार्याचा आढावा घेत आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात शुक्रवारी (दि.31) सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यादरम्यान सई परांजपे लिखित आणि दिग्दर्शित इवलेसे रोप या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. या प्रसंगी पुढारीच्या ठाणे-पालघर-रायगड आवृत्तीचे निवासी संपादक शशिकांत सावंत, मार्केटिंग हेड अमित तळेकर, कोमल हाडवळे यांच्या उपस्थितीत नाट्य अभिनेते मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना भागवत यांच्या हस्ते पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांना आयकॉन पुरस्कारासह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.