दशावतारी परंपरा  pudhari photo
ठाणे

दशावतारी परंपरा

पुढारी वृत्तसेवा

डॉ. महेश केळुसकर

पालखीचा विधी झाल्यानंतर दशावतारी रंगपटात पेटारा पूजन होतं. हे पेटारा पूजन दशावतारी मालकाने करायचं असतं. पेटार्‍यासमोर संपूर्ण रात्रभर समय पेटती ठेवली जाते. या पेटार्‍यात ज्या गावातून हा पेटारा दशावतार करायला निघतो, त्या ग्रामदेवतेकडून दिलेला नारळ असतो. म्हणजेच साक्षात ग्रामदेवताच त्या पेटार्‍यात गणपतीच्या मुखवट्याइतकीच पूज्य मानली जाते.

येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यातलो शेवटचो दशावतार. त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचलंय की माझो नवस पूर्ण झालो.”

“ राखणदाराफुडे कोन मोठो नाय.” “ तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे. जंगलात फक्त जनावरं असतात. ”

“ तुम्ही जमीन बडवत बसा आणि तो पंजा मारून निघून जाईल ” हे संवाद सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी आहेत. सुबोध खानोलकर दिग्दर्शित ज्या दशावतार या मराठी चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय, त्यातील हे संवाद आहेत. प्रेक्षकांमध्ये उलट-सुलट चर्चा आहे सुरू आहे. काहींचं मत असं आहे की, या चित्रपटात पारंपरिक दशावतारी खेळाबद्दल आस्था दाखवण्यात आलेली नाही आणि वरवरच्या माहितीवर दशावतार लोककलेचा व्यावसायिक फायद्यासाठी वापर करून घेतलाय. तर काही जणांना वाटतं की, या चित्रपटाद्वारे व्यवस्थेविरुद्ध जनसामान्यांचा आक्रोश टिपेला पोहोचून सत्ताधार्‍यांविरुद्ध प्रचंड उठाव होऊ शकतो, हा संदेश अत्यंत खुबीने या दशावतारमधून देण्यात आलेला आहे. काही का असेना, पण मालवणी मुलखाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दशावताराबद्दल जगभर चर्चा सुरू झाली हेही नसे थोडके! या पार्श्वभूमीवर दशावताराच्या परंपरेबद्दल थोडं अधिक जाणून घ्यायला वाचकांना आवडेल असं वाटतं.

दशावतारी नाटक ज्या देवतेच्या उत्सवात सादर होणार असतं, त्या देवतेसमोर प्रथम सर्व मानकरी बारा बलुतेदार यांच्यासह गार्‍हाणं घालतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषेत गार्‍हाणं घालण्याची पद्धत आहे. देवतेला नारळ व त्याच्या परिवार देवतांना पानाचा विडा, तांब्याची तार (पैसा) वगैरे देऊन देवाच्या मूर्ती समोर गार्‍हाणं घातलं जातं. रात्री ग्रामदेवतेची पालखी निघण्यापूर्वी देवीची ओटी भरण्याचा विधी होतो. देवीची ओटी भरणे व गार्‍हाणी घालून देवाला नवस बोलण्याचा कार्यक्रम रात्रौ सुमारे बारा वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर मुख्य आकर्षण असलेला ग्रामविधी म्हणजे तरंग देवतांसह निघालेली देवाची पालखी मिरवणूक.

ढोल वादन, जांभ देणे, गार्‍हाणे, देवाचे संचार (अंगात येणे), देवीची ओटी भरणे इत्यादी विधी होईपर्यंत रात्रीचे बारा वाजतात. त्यानंतर ढोल वाद्यांच्या गजरात देवाची पालखी देवळाभोवती फिरवणे व तरंगदेवतांची लग्न लावणे हा प्रमुख विधी केला जातो. पालखीबरोबर रवळनाथ, सातेरी, भूतनाथ या देवतांचे तरंग त्यांचे मानकरी घेतात. पालखीच्या देऊळ प्रदक्षिणेतील देवांचा लग्नविधी प्रतीक स्वरूपात होतो. रवळनाथ या शिवस्वरूपी देवतेबरोबर सातेरी या पार्वती स्वरूप देवतेचे दरवर्षीच्या जत्रोत्सवात ग्रामवासियांच्या साक्षीने होणारं लग्न अशा प्रकारचा हा विधी होतो.

पालखीचा विधी झाल्यानंतर दशावतारी रंगपटात पेटारा पूजन होतं. हे पेटारा पूजन दशावतारी मालकाने करायचं असतं. पेटार्‍यासमोर संपूर्ण रात्रभर समय पेटती ठेवली जाते. या पेटार्‍यात ज्या गावातून हा पेटारा दशावतार करायला निघतो त्या ग्रामदेवतेकडून दिलेला नारळ असतो. म्हणजेच साक्षात ग्रामदेवताच त्या पेटार्‍यात गणपतीच्या मुखवट्या इतकीच पूज्य मानली जाते. पारंपरिक दशावतार नसलेल्या किंवा लोकाग्रहास्तव केलेल्या नाट्यरूपी दशावतारात रंगपटामध्ये पुढील आरती म्हटली जाते :

श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त... नवल गुरुरायाची धन्य आरती

ब्रह्मा विष्णू रुद्र जय जय म्हणती....

दशावतार हा ग्रामदेवतेचा ग्रामविधीचा एक भाग असल्याने बर्‍याच गावात तो देवळाच्या सभामंडपात असतो. बरेचदा अधिक जागा प्रेक्षकांनी व्यापल्यामुळे ती कमी होते. पण, दशावतारी कलावंतांची याबाबत काही तक्रार नसते. युद्धनृत्याच्या वेळी पात्राच्या नृत्याबरोबर प्रेक्षक आपोआप बाजूला सरकतात. काही वेळात रंगमंचावरील पात्रे आपल्या भूमिकेतून बाहेर येऊन प्रेक्षकांची संवाद साधून त्यांना मागे सरकून बसण्याची विनंती करतात आणि प्रेक्षक मागे गेल्यावर पुन्हा ही नटमंडळी आपापल्या भूमिकेत जातात.

मध्यभागी लाकडी बाक असतो. त्याच्या एका कोपर्‍यात मृदंग वादक असतो. मृदंग वादकाच्या डाव्या बाजूला चकवा (झांजवादक) असतो. हाच बर्‍याचदा सूत्रधारकी करतो. मृदंग वादकाच्या उजव्या बाजूस पायपेटी वाजवणारा बसतो. बर्‍याच दशावतारी मंडळीत पायपेटी वाजवणारा पेटारा मालक असतो. बाकड्याचा उरलेला भाग हा दशावतारातील विविध लोकेशन्स म्हणून वापरला जातो जसे की, राजसिंहासन, असुर महाल, रंग महाल, बाग इत्यादी...

देवळं लहान असतात. तिथल्या छोटेखानी सभामंडपात जास्त प्रेक्षक बसू शकत नाहीत. तेव्हा देवळासमोर देवाची गाभार्‍यातली मूर्ती रंगमंचावरून समोर दिसेल अशा प्रकारे मंडपावर झावळं टाकून चारही बाजूला मोठे बांबू उभे करून तात्पुरता रंगमंच उभारला जातो. मागणीसाठी केलेल्या दशावताराचे आयोजक मात्र आपली कल्पकता या पारंपरिक खेळात आणण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या राजमहालाचे रंगवलेले पडदे लावतात आणि काही वेळा प्रकाशयोजना करतात. मात्र अजूनही पारंपरिक दशावताराची मोहिनी मालवणी मुलखातील प्रेक्षकांवर आहे. दशावतार हा देवळाच्या सभामंडपात चारही बाजूला प्रेक्षक व मध्ये रंगमंच या त्याच्या नैसर्गिक बाजात अधिक परिणामकारक वाटतो.

दशावतारी नाटकातील पूर्वरंगास आड दशावतार म्हणण्याचा प्रघात आहे. हे आड दशावतार तिथीच्या जत्रोत्सवातच सादर करायचे असतात असा संकेत आहे. पूर्वी लोकांकडे भरपूर वेळ होता. तेव्हा आड दशावताराच्या आधी मृदंग व झांजेचं वादन अर्धा अर्धा तास चालायचं. नंतर आड दशावतारात येणारा पद्यमय भाग सूत्रधार तालासुरात गायचा. या दशावतारातील भटजी व शंकासूर यांच्या प्रश्नांना सूत्रधार उत्तरं द्यायचा व प्रत्यक्ष कथा संवादात भाग घ्यायचा. सर्वात प्रथम बसवानृत्य म्हणजे शंकर पार्वतीचं नृत्य व्हायचं. शिवपार्वतीच्या नंदीवर बसून केलेल्या या नृत्यानंतर गणपतीचे दोन द्वारपाल नृत्य करायचे.

गणपतीबरोबर रिद्धी, सिद्धी येतात आणि त्याही गणपतीसह नाचतात. द्वारपाल आताच्या दशावतारात येत नाहीत. आड दशावतारानंतर उत्तररंग म्हणजे आख्यान लावलं जातं. एका कथानकाची व्यवस्थित आकारणी पात्रं करतात. उदात्त तत्त्वांचं दर्शन या दशावतारी आख्यानात दाखवलं जातं. मात्र या आख्यानांतील संवादच, पदं लिहिलेली नसतात. त्यातील गीतं, पदं ही रंगभूमीवर रूढ किंवा प्रसिद्ध असलेल्या त्या त्या काळातील नाटकांमधून घेतली जातात. संतांच्या रचनाही घेतल्या जातात. पाणियासी कैसी आता एकली मी जाऊ... ही संत एकनाथांची गवळण यात हमखास असते. युद्ध संगीतात संशय का मनी आला, भाव अंतरीचे हळवे... आदी पदं म्हटली जातात. शिवलीलामृत, महाभारत, रामायण, नवनाथ कथा, पुराण आणि काल्पनिक कथा यातील आख्यानं नाट्यरूपात दाखविण्यात येतात.

कथेच्या मागणीप्रमाणे नृत्य हे मूळ कथानकाचा अविभाज्य भाग बनतं. अशी नृत्यं केरवा, धुमाळी या तालात व विशिष्ट लयीत सादर केली जातात. आख्यान समाप्तीनंतर दहीहंडी फोडून दशावताराची सूर्योदयाला समाप्ती होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत तळकोकणात, गोव्यात जत्रोत्सवाच्या तिथी असतात. या हंगामात सादर होणारे दशावतार हे देवतोत्सवातील विधी नाटक म्हणून सादर होतात. चैत्र पौर्णिमेनंतर वैशाख महिन्यापर्यंत म्हणजेच मे महिना अखेरपर्यंत दशावतारी नाटकाचे सादर होणारे प्रयोग हे करमणुकीचे लोकनाटक म्हणून सादर होतात. या नाटकांमध्ये सुरुवातीला गणपतीचं पात्र दाखवतात. परंतु पुढचे भटजीपासून सरस्वती, ब्रह्मदेव, शंकासूर व विष्णूचा मत्स्यावतार ही पात्रं दाखवली जात नाहीत. पुढे संपूर्ण आख्ख्याननाट्य दाखवलं जातं. रंजन प्रधान दशावतारी नाटक असं त्याचं स्वरूप असतं. परंतु ह्या नाटकाला जत्रोत्सवाच्या मानाने जास्त मानधन मिळतं. मात्र रंजनासोबत लोकसमूहाला बोध करणं, त्यांना शिक्षित करणं, नीती, रीती, शील, चारित्र्य, मूल्यकल्पना याविषयी प्रबोधन करणं हे दशावतारी नाट्यप्रयोगाचं महत्त्वाचं प्रयोजन असतं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT