दापोली : प्रवीण शिंदे
दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर हिवाळ्याची चाहूल लागताच सिगल पक्ष्यांची वर्दळ वाढू लागली आहे. सिगल पक्षांचे आगमन जणू काही दापोलीच्या पर्यटनाचा उत्सवच आहे. निळ्याशार समुद्राच्या लाटांवर थव्याने झेपावणारे हे पक्षी खाद्य शोधताना पंख फडफडवणारे, त्यांच्या हालचालींचे मोहक नजारे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
खास या सिगल पक्ष्यांचे थवे आणि त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी दूरदूरवरून पर्यटक दापोलीच्या किनाऱ्याला भेटी देत आहेत. थंड वाऱ्याची सुरुवात आणि शांत सकाळ या पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करत असल्याने दापोली, मुरूड, हर्णे आणि आंजर्ले या किनाऱ्यांवर त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
सिगल पक्ष्यांची झेप आणि त्यांच्या चपळ हालचालींनी दापोलीच्या किनाऱ्यावरील निसर्गसौंदर्यात आणखी भर पडली आहे. हिवाळ्यात या पक्ष्यांचे दर्शन हे आता दापोलीच्या किनाऱ्याचे खास वैशिष्ट्य बनले असून, निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी ही खऱ्याअर्थाने एक रम्य पर्वणी ठरत आहे.