भाईंदर : मिरा-भाईंदर व मुंबई महापालिका हद्दीवर असलेला दहिसर टोल नाका वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत वादातिक बनला असतानाच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या इशाऱ्यानंतर टोल वसूल करणाऱ्या कंपनीने तूर्तास मुंबई वाहिनीवरील टोल नाका मिरा-भाईंदर दिशेने 50 मीटर अंतरावरच स्थलांतर केला असून हे तात्पुरते स्थलांतर असल्याचा सरनाईक यांच्याकडून करण्यात आला.
वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सतत वादग्रस्त ठरलेला दहिसर टोल नाका मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरसावे वाहतूक पुलाजवळ स्थलांतर करण्यास भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नकार दिला. यानंतर परिवहन मंत्र्यांनी 8 नोव्हेंबर रोजी टोल नाका स्थलांतरच्या अनुषंगाने एनएचएआय (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) च्या अधिकाऱ्यांसोबत स्थळपाहणी केली. त्यावेळी वसई-विरार काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील टोल नाक्याच्या स्थलांतराला तीव्र विरोध दर्शवित एनएचएआयच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.
तत्पूर्वी ठाणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा वनमंत्री गणेश नाईक यांनी हा टोल नाका वसई-विरारच्या हद्दीतील महामार्गावर स्थलांतर करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे हा दहिसर टोल नाका वरसावे वाहतूक पुलाजवळ स्थलांतर करण्यात अडचण निर्माण झाली असतानाच परिवहन मंत्र्यांनी टोल वसुल करणाऱ्या एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. कंपनीला टोल नाका स्थलांतरासाठी 13 नोव्हेंबरचे अल्टिमेटम देत अन्यथा हा टोल नाका बंद करण्याचा इशारा दिला होता.
3 लेन हलक्या, 2 लेन अवजड वाहनांसाठी
मिरा-भाईंदर ते मुंबई वाहिनीवरील टोल नाक्याच्या स्थलांतराला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात येणार असून हा टोल देखील 50 मीटर अंतरावरच स्थलांतर करण्यात येणार आहे. मुंबई व मिरा-भाईंदर वाहिनीवरील टोल नाक्यावर प्रत्येकी 5 लेन उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्यातील प्रत्येकी 3 लेन हलक्या वाहनांसाठी तर प्रत्येकी 2 लेन अवजड तथा इतर वाहनांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
संभाव्य स्थलांतर वादात सापडणार
मुंबईच्या दिशेकडील टोल नाका जैसे थे सुरु असून दोन्ही बाजूंकडील टोल नाके मागे-पुढे केल्याने येथील वाहतूक कोंडी सुसह्य झाल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पेढे भरवून टोल नाका स्थलांतरावर समाधान व्यक्त केले. तर हा टोल नाका स्थलांतर करण्याचे दिलेले आपण वचन पूर्ण केल्याचा दावा त्यांनी करीत त्यांनी हे स्थलांतर तात्पुरत्या स्वरूपाचे स्पष्ट केले. तर टोल नाक्याच्या वरसावे येथील स्थलांतराला रितसर परवानगी घेतल्यानंतर तो त्याच ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे बोलले जात असल्याने टोल नाक्याचे हे संभाव्य स्थलांतर वादात सापडणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर, माजी नगरसेवक विक्रमप्रताप सिंह, संदीप पाटील आदी उपस्थित होते.