ठाणे ः अनुपमा गुंडे
गेल्या 2 वर्षांपासून खोळंबलेल्या महानगरपालिकांच्या निवडणूकांचे बिगुल दिवाळीनंतर वाजणार आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर यंदांच्या दहीहंडी उत्सवाला राजकीय झळाळी मिळणार असून या झळाळीत गोविंदा पथकांची चांदी होणार आहे. निवडणुकांमुळे दहीहंडीचे राजकीय आयोजकही वाढणार असून गोविंदा पथकांसाठी राजकीय प्रायोजक वाढणार असल्याने गोविंदा चांदी होणार आहे.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी ठाण्याच्या टेंभी नाक्यावर सुरू केलेल्या उत्सवाला गेल्या काही वर्षांत इव्हेंटचे रूप प्राप्त झाले आहे. तरूणाईला साद घालणारा हा उत्सव राजकीय नेत्यांनी हायजॅक केल्याने दहीहंडी आणि राजकीय आयोजक असे समीकरणच झाले आहे. या आयोजनात ठाण्याचे राजकीय नेते आघाडीवर असल्याने तमाम मुंबईतील गोविंदा पथके ठाण्यात हंडी फोडण्यासाठी न चुकता येतात, त्यामुळे आयोजकांनाही त्याची दखल घ्यावी लागते. या आयोजनात ना मुंबईकरांना नाराज करता येत ना ठाणेकरांना, म्हणून मोठे आयोजक मुंबईकरांसाठी आणि ठाणेकरांसाठी वेगवेगळ्या हंड्याही बांधतात.
राज्यात दहीहंडीचे सर्वात जास्त आयोजक ठाणे शहरात आहेत. ठाण्यात 10 -15 मोठे आयोजक तर 200 - 250 च्या घरात लहान आयोजक हंड्या बांधतात. या हंड्या फोडण्यासाठी मुंबईकरांइतकाच ठाण्याचे गोविंदाही आघाडीवर असतात. पुरूष गोविंदाच्या तुलनेत महिला गोविंदांची संख्या लक्षणीय रित्या कमी असली तरी त्यांच्यासाठी स्वतंत्र हंडी प्रत्येक आयोजक बांधतात हे या नगरीचे आणखी एक वैशिष्ट्य. दहीहंडीच्या आयोजनात ठाण्यातील सर्वच राजकीय पक्ष पुढाकार घेतात. या उत्सवात गोविंदावर बक्षीसांची लयलूट राजकीय नेते करतात, त्यामुळे गोविंदा पथकांचा ठाण्याकडे ओढा असतो.
राज्यात 1200 दहीहंडी पथके
राज्यात सुमारे 1200 च्या घरात दहीहंडी पथके आहे. लहान पथकांमध्ये 100 च्या घरात तर मोठ्या पथकांमध्ये कमीत कमी 500 गोविंदा पथके आहेत. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 2 ते 3 हजाराच्या घरात लहान - मोठ्या हंड्या आहे. मुंबईत 500, ठाणे - पालघरात सुमारे 250 ते 300 दहीहंडी पथके आहेत. उर्वरित गोविंदा पथके राज्यात विखुरलेली आहेत.
कलाकारांची हजेरी
ठाण्यातल्या दहीहंडीत बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील तारे तारका मोठ्या संख्येने येतात. या कलाकारांनी दहीहंडी आयोजक लाखो रूपयांची बिदागी देतात.
मुंबई, ठाण्यात शिंदे गटाच्या हंड्यांमध्ये वाढ
राज्यातल्या सत्ताकारणाची झळ गेल्या 2 वर्षापासून दहीहंडी उत्सवाला बसली आहे, त्यामुळे गोविंदा पथक आणि राजकीय आयोजकही विभागले गेले आहेत. उच्च न्यायालयाने या उत्सवाला घातलेल्या कडक निर्बंधांमुळे दहीहंडी उत्सवातले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष सारख्या संस्था बाहेर पडले आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांचा या उत्सवातील शिरकाव गेल्या 2 वर्षांत वाढला आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात शिंदे गटाच्या हंड्यांमध्ये वाढ झाली आहे.
केवळ हंड्यामध्येच वाढ नाही तर महापालिका निवडणूकी डोळ्यासमोर ठेवून मोठ्या गोविंदा पथकांचे टी - शर्ट, प्रवास खर्च, नाष्टा, जेवण आणि दुखापत झाल्यास गोविंदाच्या उपचारांच्या खर्चापर्यंत राजकीय पक्ष गोविंदाच्या पथकांच्या मागे उभे आहेत, यात शिंदे गटाचे नेते, नगरसेवक यांची संख्या जास्त असल्याचे गोविंदा पथकांनी खासगीत बोलतांना सांगितले.