पोलादपूर : ड्रॅगन फ्रूट हे एक निवडुंग कुळातील अत्यंत महत्वपूर्ण फळ पीक आहे. सुरवातीच्या काळात केवळ शोभेसाठी लावल्या जाणार्या या झाडांचा अलीकडे फळ पीक म्हणून शेतकरी स्वीकार करत आहेत. हे फळ खुप आकर्षक व सुंदर असल्यामुळे याला ’नोबल वुमन’ आणि ’रातराणी’ या नावाने संबोधले जाते. प्रामुख्याने साल आणि गर यांच्या रंगांनुसार फळाचे विविध प्रकार पडतात.
भारतामध्ये पांढरा गर व लाल साल असणार्या प्रजातीची लागवड केली आहे, त्याचबरोबर लाल गर व लाल साल आणि पांढरा गर व पिवळी साल या प्रकारांकडे सुद्धा शेतकर्यांचा कल वाढताना दिसत आहे. पोलादपूर तालुक्यातील अमर राजेंद्र कदम याने नानेघोळ गावात प्रायोगिक शेतीत ‘ड्रॅगन्स फ्रूट’ची लागवड केली आणि लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं. आता तो गावातून मुंबईकडे नोकरी-धंद्यासाठी जाणार्या तरुणांना गावातच राहून शेती करण्याचा संदेश देत आहे.
या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणार्या पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंटमुळे या पिकास ’सुपर फ्रूट’ म्हणून सुद्धा प्रचिती मिळत आहे. या फळाचा उपयोग टेबल व प्रोसेसिंगसाठी केला जात आहे. या फळापासून जाम, ज्यूस, जेली, कँडी, सिरप, तसेच वाइन इत्यादि प्रक्रियायुक्त मूल्यवर्धित पदार्थ बनवले जाऊ शकतात. या फळाच्या सालीमध्ये उच्च प्रमाणात पेक्टिन असल्याने त्यांचा वापर फळ प्रक्रियेत जेलिंग एजेंट म्हणून केला जातो. तसेच सालीपासून खाद्य रंग सुद्धा बनवले जाऊ शकतात.या फळ पिकाचे विविध औषधी गुण सुद्धा आहेत.
फळांशिवाय याच्या पानांचा आणि फुलांचा उपयोग परंपरागत हाइपोग्लाइसेमिक, मूत्रवर्धक एजेंट, म्हणून लॅटिन अमेरिकेत केला जात आहे.‘क’ आणि ‘ब’ जीवनसत्व तसेच फ्लावोनोइड्स सारखे विविध अँटीऑक्सिडंट या फळात उपस्थित असल्याने रक्तातील कॉलेस्ट्रॉल व उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करते. या व्यतिरिक्त या फळामध्ये तंतुमय पदार्थांचे योग्य प्रमाण असल्याने हे पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. या फळामध्ये खूप कमी प्रमाणात साखरेचे प्रमाण आहे. त्यामुळे, मधुमेह असणार्या व्यक्तीसाठी हे फळ उत्तम मानले जाते. या फळामध्ये फॉस्फोरस व कॅल्शियम सारखे खनिज पदार्थ सुद्धा अधिक प्रमाणात असतात, जे हाडांच्या आणि दातांच्या योग्य वाढीसाठी फायदेशीर आहेत. वजन कमी करणे तसेच स्मृति वाढवणे, दृष्टी सुधारणे इत्यादि विविध फायदे या फळासोबत जोडले गेले आहेत.
लागवडीची वेळ आणि पद्धतीमान्सूनपूर्वची वेळ ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी योग्य मानली जाते परंतु पाण्याची सोय असल्यास, अतिउष्ण महीने वगळता वर्षभरात कोणत्याही महिन्यात लागवड करता येऊ शकते. ड्रॅगन फ्रूट हे एक वेलवर्गीय फळपीक असून पिकाच्या वाढीसाठी लागवडीपूर्वी आधार प्रणाली उभारावी लागते. यामध्ये आरसीसी सिमेंट किंवा लाकडी खांबांचा उपयोग केला जातो. परंतु या पिकाची उत्पादन क्षमता जवळपास 20 वर्षे व त्यापेक्षा अधिक असल्यामुळे आरसीसी सिमेंटचे खांब वापरणे योग्य ठरते. अमरने पारंपरिक भात-शेती करण्याऐवजी सुरूवातीला कलिंगड, अननस, झेंडूची फुले अशी पिकं घेतली. याच काळात ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा विचार शेती माती आणि हवामानाच्या अभ्यासामुळे अमरला सुचला.