Walkas Behere Bridge Cracks 
ठाणे

Thane Walkas Behere Bridge Cracks | वालकस-बेहरे पुलाच्या खांबाला भेगा, संरचनात्मक तपासणी करावी

ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

खडवली : मनोज ताठे

खडवली ग्रामपंचायत हद्दीतील भातसा नदीवरील वालकस-बेहरे गावांना जोडणाऱ्या जुन्या पुलाच्या खांबावर भेगा पडल्याचे दिसून येत आहेत. हा पूल जीर्ण असून या ठिकाणी नवीन पूल उभारण्याची मागणी होत आहे.

दरम्यान पुलाच्या खांबांना भेगा गेल्याच्या स्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपूर्वी भातसा प्रकल्पाच्या काळात उभारण्यात आलेला हा पूल आजही परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना पुलाच्या खांबावर दिसून येणाऱ्या भेगांमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावरून दररोज ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक होत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित यंत्रणांनी पुलाची तातडीने संरचनात्मक तपासणी करून तो वाहतुकीस सुरक्षित आहे की नाही, याबाबत अधिकृत अहवाल जाहीर करावा. आवश्यक असल्यास दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन संभाव्य धोका टाळावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

"दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन पुलाची पाहणी करावी," अशी मागणी वाल्कस व बेहरे येथील ग्रामस्थांनी केली आहे. कल्याण तालुक्यातील भातसा नदीवरील वालकस-बेहरे पूल हा ५० वर्षांपेक्षा अधिक जुना आणि अत्यंत धोकादायक झाल्याचे दिसून येत आहे. या जुन्या व जीर्ण पुलाच्या खांबांना भेगा गेल्यामुळे, तसेच मुसळधार पावसात पूल वारंवार पाण्याखाली जात असल्यामुळे वालकस, बेहरे आणि मठाची वाडी येथील ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटतो. यासाठी दुरुस्ती आणि नव्या पुलाची मागणी करण्यात येत आहे.

ग्रामस्थांनी नवीन व उंचावर पूल बांधण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. पावसाळ्यात सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवत असल्याने या पुलावरून वाहतूक करणे जीवाला धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी तत्काळ मजबूत पर्यायी व्यवस्थेची आणि नव्या पुलाच्या बांधकामाची मागणी होत आहे.

जीर्ण पुलाचा धोका...

हा पूल ५० वर्षे जुना असून त्याच्या संरचनेला आणि खांबांना मोठे नुकसान व भेगा गेल्या आहेत. पावसाळ्यात पाण्याखाली पूल जाणे, गावांचा संपर्क तुटणे, आदी समस्या उद्भवतात. मुसळधार पावसामुळे भातसा नदीच्या फुगवट्यामुळे हा कमी उंचीचा पूल सतत पाण्याखाली जातो, ज्यामुळे नागरिकांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT