खानिवडे (पालघर, ठाणे) : वसई तालुक्यातील अर्नाळा येथे शनिवारी पहाटे एका स्कॉर्पिओ गाडीतून होणारी गो तस्करी उघड झाली आहे. यावेळी या स्कॉर्पिओचा नालासोपारा पोलीसांकडून थरारक पाठलाग करत असताना ती रस्त्याच्या कडेला असलेल्या सुभाष लेन येथील एका घराच्या तार कंपाउंडला धडकली. गाडीतील तस्करांनी पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला .मात्र यातील एकाला पकडण्यात नालासोपारा पोलिसांना यश आले आहे.
नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विशाल वळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोरक्षक राजेश पाल याला नालासोपारा पश्चिम टाकीपाडा येथे दोन गोवंश जातीची जनावरे कत्तलीसाठी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती.त्यांनी याबाबत नालासोपारा पोलीसाशी संपर्क साधला होता.चार पोलिसांनी पाल याला सोबत घेऊन टाकी पाडा येथे सापळा रचला असता सकाळी पाच वाजता गास रोड येथुन संशयित कार येताना दिसली. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता स्कॉर्पियो चालकानी त्यांना हुलकावणी देऊन स्कॉर्पिओ भरधाव नेली. यामुळे पोलिसांनी पाठलाग सुरू केला. सोपारा-नाळा-सत्पाळा -अर्नाळा असा तब्बल 50 मिनीटे थरारक पाठलाग सुरू असताना अर्नाळा हद्दीत सुभाष लेन जिल्हा परिषद शाळेजवळ असलेल्या तार कारची धडक झाल्याने गाडी अडकून पडली.
यावेळी तिघां पैकी एकाला अटक करण्यास पोलिसांना यश आले. तसेच दोन आरोपी फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध पोलिसां कडून चालू आहे. स्कारपिओ गाडीत दोन गिर जातीचे बैल बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेआहेत. सध्या ते बैल सकवार गो शाळा येथे पाठवण्यात आले आहेत. पुढिल तपास नालासोपारा पोलीस करत आहेत.दरम्यान अर्नाळ्यात ही वार्ता समजताच मोठा जमाव घटनास्थळी जमला होता.त्यावेळी प्रत्येक जण म्हणत होता की सर्व जाती धर्माचे नागरिक आम्ही एकोप्याने येथे राहत असून अश्या शांत असलेल्या आपल्या भागात गोतस्करी होत असल्याने मूळे संताप अनावर होत आहे.