Bhayandar Construction Worker Accident Pudhari
ठाणे

Bhayandar Construction Worker Accident: इमारतीवरून पडून 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कंत्राटदारांकडून कामगारांच्या सुरक्षेची ऐशीतैशी केली जात असल्याचा आरोप होत आहे.

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड: शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या नवनिर्माणाधीन इमारतींच्या कामात कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाईंदर पूर्वेकडील भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या मे. सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कोर्टयार्ड इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून पडून एका तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कंत्राटदारांकडून कामगारांच्या सुरक्षेची ऐशीतैशी केली जात असल्याचा आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेच्या गोल्डन नेस्ट सर्कल येथील आरक्षण क्र. 214 मध्ये शासनाच्या युडीपीसीआर कायद्यांतर्गत बाय-बॅक पॉलिसीनुसार 30 टक्के जागेत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास या इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून एक कामगार खाली कोसळला.

तो थेट सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी पत्र्यावर पडला. हा पत्रा चिरून तो खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत कामगाराचे नाव फिरदुस हबिबर रहमान आलम (वय 19 वर्षे) असे आहे. तो मूळचा आसाम राज्यातील कोक्राझार जिल्ह्यातील रहिवासी होता. मागील काही दिवसांपासून तो या प्रकल्पावर मजुरीचे काम करत होता.

फिरदुस सकाळी लवकर इमारतीला पाणी मारण्यासाठी वर गेला होता, असे समजते. मात्र, बांधकाम कंत्राटदाराने कामाची वेळ सकाळी 9 वाजता सुरू होत असल्याचे सांगत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. या अपघातामुळे बांधकाम ठिकाणच्या सुरक्षा यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाका कामगार आणि परप्रांतीय मजुरांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी भाईंदरच्या शासकीय टेम्बा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेत कंत्राटदाराचा निष्काळजीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT