डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यांपासून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका घडामोडीची भर पडली असून काँग्रेसच्या विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण हे राजीनामे दिल्याचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले असले तरी या राजीनाम्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून इथले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांची सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्ष भाजपा आणि शिवसेनेमध्ये प्रवेशाची मोठी चढाओढ दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी बुधवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यांच्यासोबत कल्याण-डोंबिवलीतील इतर समर्थक पदाधिकाऱ्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे पक्षश्रेष्ठींना सादर केले आहेत.
आपल्या पदांचे हे राजीनामे देण्यामागे कोणतेही इतर राजकीय कारण नसून पक्षातील नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी या उद्देशाने आपण राजीनामा देत आहोत. हा नाराजीनामा नसल्याचे सचिन पोटे यांनी स्पष्ट केले. तर आमचे नेते राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वरिष्ठ नेते संजय दत्त यांच्या मार्गदर्शनानुसार यापुढेही आपली वाटचाल सुरूच राहील.
तसेच इतक्या वर्षांपासून आपण काँग्रेस पक्ष आणि त्याच्या विचारधारेशी एकनिष्ठ आहोत. यापुढेही आपली ही पक्षनिष्ठा कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर इतक्या कमी काळामध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर विश्वास दाखवून दिलेल्या विविध जबाबदाऱ्यांबाबत आपण त्यांचे नेहमीच ऋणी राहू, असेही पोटे यांनी स्पष्ट केले. आपल्याला अनेक पक्षांकडून ऑफर आल्या असल्या तरी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जिल्हाध्यपदी राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती
काँग्रेसचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर राजाभाऊ पातकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरीष्ठ उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र पातकर यांना पाठविण्यात आले आहे. आगामी काळात सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणार असून घराघरात काँग्रेस पक्ष पोहोचविण्यासाठी काम करणार आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महापौर बसविण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास राजाभाऊ पातकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.