ठाणे : युती आणि आघाडीचा धर्म पाळताना काही तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फारसे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना चांगली संधी असते त्यामुळे पालिका निवडणुकीमध्ये आघाडी करायची कि नाही हे प्रदेश पातळीवर न ठरवता याचा निर्णय स्थानिक पातळीवरच घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाण्यात केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी पर्यंत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता पालिका निवडणुकांना खर्या अर्थाने वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी गुरुवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे सचिव यु बी व्यंकटेश, माजी खासदार कुमार केतकर, ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश सदस्य राजेश जाधव आणि ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्वच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या युतीमध्येच लढल्या जातील असा दावा युतीमधील नेते करत आहेत. या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेस पक्षाने हा निर्णय स्थानिक पातळीवर सोडला असल्याने या निवडणुकीत काँग्रेसने एकप्रकारे एकला चलोचा नारा दिला असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
जीएसटी सुधारणा हा राहुल गांधींचा विजय
जीएसटीमध्ये सुधारणा करा असे राहुल गांधी यांनी 8 वर्षापूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि जीएसटीमध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. जीएसटीमधील सुधारणा हा राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी विचाराचा मोठा विजय असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस 22 सप्टेंबर रोजी राज्यभर दुकानदार, व्यापारी आस्थापने येथे पेढे वाटून साजरा करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांना सांगितले.
2029 ला परिवर्तन होणार
कोकणात आघाडीमुळेच काँग्रेसला काही ठिकाणी मागे जावे लागले असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे आघाडी करणे हा अपरिहार्यतेचा भाग असल्याचे सपकाळ यांनी सांगितले. मात्र संपूर्ण देशात काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळत असून भाजपशी संघर्ष करणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असून 2029 ला परिवर्तन होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे फडणवीसांचे काम
राज्यात तीसरी भाषा लादण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असून मराठी भाषा ही केवळ भाषा नसून महाराष्ट्र धर्म व संस्कृती आहे. तिसरी भाषा लादून देवेंद्र फडणवीस मराठीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. मराठी भाषेसह सर्व भाषा गुण्यागोविंदाने नांदल्या पाहिजेत, विविधेत एकता ही भारताची ओळख आहे ती टिकली व जपली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे.
शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या
मुसळधार पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले असून सरकारने सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये शेतकर्यांना द्यावेत. शेतपिकाबरोबरच लाखो एकर शेतजमीन खरडून गेली आहे त्यापोटी हेक्टरी 5 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. आताचा हंगाम पुर्ण वाया गेला असल्याने रब्बी हंगामात शेतकर्यांना मोफत बियाणे व खते द्यावीत आणि शेतकर्यांची कर्जमाफी करावी, अशा मागण्याही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केल्या.