College Student Killed in Kalyan
डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बिर्ला महाविद्यालयाजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली चिरडून महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला. एसटीच्या मागील चाकाखाली येऊन दुचाकीवरील हा विद्यार्थी चिरडला गेला. अपघातात ठार झालेला दुचाकीस्वार बिर्ला महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
अमनकुमार दुबे (वय १७) असे बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर अमनकुमार दुबे महाविद्यालयातून बाहेर पडला. तो दुचाकीवरून आपल्या घरी निघाला होता. बिर्ला महाविद्यालयासमोरच्या मुंबई-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर सर्वाधिक वर्दळ सुरू असते. या रस्त्यावरून जात असताना अमनकुमार दुबे एका एसटी बसच्या समांतर दुचाकी चालवत होता. बस चालक त्याच्या वेगात बस पुढे नेत होता. अचानक अमनकुमार दुबे दुचाकीसह तोल जाऊन बसच्या मागच्या चाकाखाली आला. अमनकुमार तोल जाऊन पडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
दुचाकीवरील तरूण बसच्या मागच्या चाकाखाली येताच इतर वाहन चालक आणि पादचाऱ्यांनी ओरडाओरडा केला. एसटीच्या चालकानेही जागीच बस थांबवली. मागच्या चाकाखाली आल्याने अमनकुमार दुबे गंभीर अवस्थेत होता. गस्तीवरील वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्याला तत्काळ रूग्णवाहिकेतून जवळच्या रूग्णालयात नेले. तेथून त्याला केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापी तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर बिर्ला महाविद्यालयासमोरील रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सर्व प्रकारची वाहने मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावर अडकून पडली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर वाहतूक पोलिसांना या भागात दाटलेली वाहतूक कोंडी सोडवली. अपघातग्रस्त एसटी राजगुरूनगर बस आगाराची होती. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.