Thane Metro pudhari photo
ठाणे

Thane Metro : नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातून मेट्रो विस्ताराला गती

मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ च्या पिट लाईनची सीएमआरएसकडून तपासणी सुरू

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या तसेच वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिका ४ आणि ४अ या मार्गिकांसाठी उभारण्यात आलेल्या पिट लाईन सुविधेची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस ) तपासणी सुरू करण्यात आली आहे.

संपूर्ण मेट्रो डेपोचे काम पूर्ण होण्याची वाट न पाहता मेट्रो सेवा लवकरात लवकर प्रवाशांसाठी सुरू करता यावी, यासाठी एमएमआरडीएच्या वतीने या अभिनव कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. या अंतर्गत उभारण्यात आलेल्या पिट लाईन सुविधेचा वापर मेट्रो गाड्यांची आवश्यक तपासणी, देखभाल तसेच गाड्या थांबवण्यासाठी करण्यात येणार आहे.

वडाळा ते कासारवडवली आणि पुढे गायमुखपर्यंत वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या मेट्रो ४ आणि ४ अ मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यासाठी पूर्ण क्षमतेचा मेट्रो डेपो विकसित होत असतानाच उपलब्ध पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून पूर्ण झालेल्या मेट्रो मार्गिका लवकर प्रवासी सेवेत आणण्याचा एमएमआरडीएचा हा प्रयत्न आहे.

गायमुख ते कॅडबरी जंक्शन या प्राधान्य टप्प्यात एकूण १० स्थानकांचा समावेश आहे. यामध्ये गायमुख, गोवनीवाडा, कासारवडवली, विजय गार्डन, डोंगरीपाडा, टिकुजी-नी-वाडी, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडा, कॅडबरी जंक्शनचा समावेश आहे. पिट लाईनच्या सीएमआरएस तपासणीला सुरुवात झाल्याने मेट्रो मार्गिका ४ व ४अ ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

मेट्रो मार्गिका ४ अ (कासारवडवली ते गायमुख)

  • ही मार्गिका २.७ ते २.८८ किलोमीटर लांबीची आहे.

  • हा मार्ग मेट्रो ४ चा पुढील विस्तार आहे, जो कासारवडवली ते गायमुखपर्यंत जातो.

  • या भागात गोवनीवाडा आणि गायमुख अशी २ नवी स्थानके समाविष्ट आहेत.

  • भविष्यात गायमुख स्थानक ठाण्याला मीरा रोडशी जोडणाऱ्या मेट्रो मार्ग १० साठी महत्त्वाचे जंक्शन ठरणार आहे.

काय आहे पिट लाईन सुविधा?

मेट्रोची पीट लाईन ही मेट्रो गाड्यांच्या (कोचेस) देखभालीसाठी आणि तपासणीसाठी डेपोमध्ये किंवा ट्रॅकखाली बनवलेली एक विशेष खड्ड्याची सुविधा आहे. याद्वारे तंत्रज्ञ गाडीच्या खाली उतरून किंवा सुरक्षित अंतरावरून ट्रेनच्या खालील भागाची तपासणी तसेच दुरुस्ती करता येते. पारंपरिक रेल्वे आणि मेट्रो प्रणालींमध्ये ही सुविधा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

पीट लाईनचे मुख्य उपयोग

  • ट्रेनच्या तळाशी असणाऱ्या भागाची पाहणी करणे.

  • बिघाड झाल्यास गाड्या न उचलता दुरुस्ती करणे.

  • गाड्यांच्या खालचा तसेच वरचा भाग स्वच्छ ठेवणे.

  • फेरीत जाण्यापूर्वी गाडी सुरक्षिततेची खात्री करणे.

मेट्रो मार्गिका ४ (वडाळा ते कासारवडवली)

  • ही मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची आहे.

  • हा मार्ग वडाळा येथून सुरू होऊन घाटकोपर, मुलुंड मार्गे ठाण्यातील कासारवडवलीपर्यंत जातो.

  • या मार्गावर एकूण ३० ते ३२ स्थानके आहेत. यामुळे मुंबई, ठाण्यामधील पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT