मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (File Photo)
ठाणे

Devendra Fadnavis : मुंबईसहित सर्व महापालिकांची हंडी आम्हीच फोडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेंभी नाका उत्सवात केला विश्वास व्यक्त

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : मुंबई महापालिकेसहित सर्व महापालिकांची हंडी आम्हीच फोडणार असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात व्यक्त केला. यापूर्वी विशिष्ट लोकांपर्यंतच लोणी जात होते, मात्र आता हे लोणी तुमच्या सर्वांपर्यंत पोहचणार आहे. असा टोला देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी लगावला. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच चालवत असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनेही उधळली.

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाका दहीहंडी उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी हे विधान केले. आनंद दिघे यांनी सुरु केलेली ही हंडी ऐतिहासिक हंडी आहे. दिघे साहेबांनी जी शिकवण दिली त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कारभार करत आहेत. त्यामुळे आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवणारे सच्चे शिवसैनिक हे एकनाथ शिंदेच असल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका

तीन वर्षापूर्वी आम्ही विकासाचे थर लावले आणि विकासाची हंडी फोडली. विरोधकांनी विकास विरोधी थर लावले मात्र त्यांची ही हंडी महाराष्ट्र मधील जनेतने फोडून टाकली. अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दिघे यांच्या मनाच्या हंडीला त्यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यापुढेही आपल्याला विकासाचे थर लावायचे असून ठाण्यासह राज्याचा विकास करायचा असल्याचे ते म्हणाले.

विधानसभेची हंडी महायुती फोडणार असे मी म्हणालो होतो आणि आम्ही २३२ थर लावूंन आमदार निवडून आणले आणि विजयाची हंडी फोडली. पेहलगाम हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानची हंडी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय लष्कराने फोडली. पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली. आता पाकिस्तानने पुन्हा थर लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांची कायमची हंडी फोडून टाकायची असल्याचेही ते म्हणाले.

दरवर्षी हजारो गोविंदा हे दिघे यांच्या या हंडीच्या ठिकाणी येतात आणि सलामी देऊन पुढे जातात. आनंद दिघे यांनी हा उत्सव सुरू केला आणि सातासमुद्रापार नेला. त्यामुळे ठाणे ही गोविंदाची पंढरी असल्याचे त्यांनी सांगितले. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवघेणी स्पर्धा नसते. येथे सर्व गोविंदाची काळजी घेतली जाते. दिघे यांची मनाची आणि सोन्याची हंडी आहे, आणि आमचे सोने हेच आमचे गोविंदा असल्याचेही ते म्हणाले. तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद मुळे मी मुख्यमंत्री झालो आणि सण उत्सवावरील असलेली बंधने आम्ही काढून टाकली असल्याचेही ते म्हणाले. सकाळपासून या उत्सवाला गोविंदा पथकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उत्सवाला खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे,जिल्हाधिकारी पांचाळ आणि हिंदी, मराठी सिनेकलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर....

मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टेभी नाका उत्सवामध्ये एकाच व्यासपीठावर आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर मुख्यमंत्री येईपर्यंत उपमुख्यमंत्री शिंदे याच ठिकाणी थांबले. त्यामुळे राज्यातील दोन्ही दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला होता.

वर्षानुवर्षे या उत्सवाचा उत्साह वाढतच आहे. ही या ठाण्याची जादू आहे. गोविंदा जसे स्वतःला फिट ठेवतात. तसे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्वतःला फिट ठेवले आहे. या उत्सवाचा उत्साह कधीच कमी होणार नाही.
- सुनील शेट्टी, अभिनेता
मी दरवर्षी या उत्सवामध्ये येतो. या सर्वांचा उत्साह खूप छान आहे, स्वतःला सांभाळा आणि उत्सव साजरा करा असा संदेश यानिमित्ताने मला द्यावासा वाटतो..
- प्रसाद ओक, अभिनेता
जे प्रेम इथे मिळाले ते प्रेम आतापर्यंत कुठेच मिळाले नाही. आणि कुठेही मिळणार नाही. तुम्ही सर्वजण. खऱ्या अर्थने हिरो आहात. तर खरे हिरो नं. १ हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत.
- गोविंदा, अभिनेता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमीच कलाकारांच्या पाठीशी असतात.मराठीमध्ये खूप चांगले चित्रपट येत आहेत. हे सर्व चित्रपट तुम्ही बघा, लहानपणी मी सुद्धा थर लावायचो. हेच थर आयुष्यात महत्वाचे यश मिळवून देणार आहेत.
-सिद्धार्थ जाधव, अभिनेता
मी सर्वाना मनापासून या उत्सवाच्या शुभेच्छा देतो. टेभी नाका दहीहंडी उत्सवात दरवर्षी तोच उत्साह पाहायला मिळतो.
- शरद केळकर, अभिनेते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT