ठाणे

Clean Air Better Health | ठाण्यासाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यान्वित

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहराला एका बाजूला खाडी आणि दुसरीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांची साथ लाभली असल्याने इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत ठाण्यातील हवा चांगली असते. मात्र ही हवा सर्वकाळात उत्तम राहावी, यासाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ कार्यान्वयीत करण्यात आली आहे. या नवीन ऑनलाइन साधनाचा नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले

उष्णता कृती आराखडा आणि नागरी पूर व्यवस्थापन नियोजन या दोन कृती आराखड्यांनंतर ठाणे शहरासाठी हवेची गुणवत्ता तपासून त्यात आवश्यक ते बदल सुचवणार्‍या नवीन यंत्रणेची मोलाची भर पडली आहे. या यंत्रणेमुळे मिळणार्‍या माहितीचा उपयोग करून तत्काळ करायचे बदल आणि दीर्घकाळात करायला लागणारे बदल याचे नियोजन करणे महापालिकेस शक्य होईल. या सूचनांमुळे हिवाळ्यात हवेची आणखी चांगली स्थिती आपल्याला राखता येईल, असा विश्वासही आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.

ठाणे महानगरपालिकेसाठी कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर (सी ई ई डब्ल्यू) आणि युएसएड (US-ID) यांनी संयुक्तपणे ही ऑनलाइन यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचे उद्घाटन नुकतेच (शुक्रवार) करण्यात आले. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मिळणार्‍या माहितीचा उपयोग नागरिकांनाही व्हावा, यासाठी लवकरच त्याची एक लिंक ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर देण्यात येणार असल्याचे आयुक्त राव यांनी जाहीर केले.

राज्यात प्रथमच यंत्रणा

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी, वेगवेगळ्या शहरात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार उपाययोजना करण्याची गरज असते. हवेचे प्रदूषण आणि वातावरण बदल यांचा अन्योन्य संबंध आहे. हे लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘क्लीन एअर आणि बेटर हेल्थ’ या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिकेसाठी ‘हवा गुणवत्ता व्यवस्थापन यंत्रणा’ तयार करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे ठाणे महापालिकेला हवा प्रदूषणाशी सामना करण्यासाठी योग्य अशी माहिती मिळेल. त्यातून उपाययोजना करता येतील. राज्यात अशाप्रकारे प्रथमच ही यंत्रणा सुरू होत आहे, असे प्रतिपादन ‘यूएसएड इंडिया’ या संस्थेचे उपसंचालक वर्गीस पॉल यांनी केले.

प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न

ठाणे महापालिका हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकाराने काम करीत आहे. उच्च न्यायालयाचे निर्देश, राज्य सरकारकडून आलेल्या सूचना यांचे पालन महापालिका करीत आहे. त्याचबरोबर ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ सारख्या उपक्रमातून धूळ आणि कचरा यांच्यापासून होणारे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली. याप्रसंगी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त (पर्यावरण विभाग) सचिन पवार, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अतिरिक्त संचालक सुषमा एक्कार, तसेच कौन्सिल ऑन एनर्जी एनवोर्मेन्ट अँड वॉटर या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT