पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील आतकोली येथील ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास परिसरातील नागरीकानी कडाडून विरोध केल्याने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. अर्जुनली, तलवली, भादाणे, आतकोली, अशा अनेक गावांनी ग्रामपंचायत ठराव करून सदर प्रकल्पास विरुद्ध दर्शविला आहे. सर्व प्रथम ही बातमी दैनिक पुढारीनेच दिली होती.
आतकोली येथील 84 एकर गुरचरण जमीनीवर ठाणे महानगर पालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार असून ठाणे शहरातील कचरा येथे आणुन त्यावर प्रक्रिया करणार आहेत. त्याबाबत पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने ठाणे महापालिका अधिकारी व परिसरातील नागरीकांची समन्वय सभा गुरुवारी (दि.17) पडघा येथील ग्रामसचीवालय सभागृहात घेण्यात आली. यावेळी ठाणे शहरातील कचरा येथे आणुन एका टप्प्यात कचर्याचे वर्गीकरण व दुसर्या टप्प्यात हरीत कोळसा निर्मीती प्रकल्प राबविण्यात येणार असून शास्त्रोक्त पद्धतीने कचर्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे सांगण्यात आले तर या प्रकल्पा शेजारीच गावे, घरे, शेती असुन जवळच आंतरराष्ट्रीय क्रीडांगण ठाणे ग्रामीणचे पोलीस मुख्यालय, वसाहत, जेल साठी जमीन प्रस्तावित केली असुन जवळच नदी, पिसे डॅम आहे.
या घनकचरा प्रकल्पामुळे परिसरात त्यांचे प्रदुषण, दुष्परिणाम दिसणार असुन नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. तसेच हजारो एकर जमीनींवरील विकास खुंठणार असल्याचे शिवसेना उपनेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे समाजसेवक भगवान सांबरे यांनी सांगितले तर या प्रकल्पा व्यतीरीक्त दुसरा कुठलाही प्रकल्प आल्यास त्याला सहकार्य करण्याचे आश्वासन स्थानिकांनी दिले. तर हा प्रकल्प डोंगराच्या कडेला किंवा इतरत्र जमीनीवर हलवण्याची विनंती करण्यात आली. तसेच आचारसंहिता काळात पोलीस बंदोबस्त घेऊन कचरा आणण्यास ठाणे महापालिकेने सुरूवात केल्यास विरोध करुन संघर्ष करणार असल्याचा इशारा स्थानिक शेतकरी रमेश शेलार व उपस्थीत नांगरीकानी दिला यावेळी उपस्थित अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त जोशी, स्थानिक गुन्हे शाखेचे सुरेश मनोरे पडघा पोलीस निरीक्षक बांळा कुंभार सह परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, नागरीक स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.