क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या उपस्थितीत रंगला प्रो गोविंदा सीझन तीन pudhari photo
ठाणे

Pro Govinda season 3 : क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या उपस्थितीत रंगला प्रो गोविंदा सीझन तीन

यंदाच्या प्रो गोविंदा चषकाचे अनावरण

पुढारी वृत्तसेवा

भाईंदर : गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या बहप्रतिक्षीत प्रो गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या वर्षीच्या चषकाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ख्रिस गेल सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करून मिरा-भाईंदर येथे करण्यात आला.

यंदाच्या प्रो गोविंदा सिझन ३ चे ब्रँड अँबेसेडर ख्रिस गेल हे असल्याचे प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले. प्रो गोविंदा लीग चे यंदाचे तिसरे पर्व असून त्याचे आयोजन ७ ते ९ ऑगस्ट दरम्यान वरळी येथील प्रतिष्ठित एसव्हीपी डोम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यावर्षीचे पर्व अधिक भव्य आणि नेत्रदीपक असणार असून त्यात १६ व्यावसायिक संघ, ३ हजार २०० हून अधिक गोविंदा आपले कौशल्य व सामर्थ्याचे प्रदर्शन करणार आहेत.

प्रो गोविंदा सीझन ३ मध्ये एकूण दीड कोटींची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम पारितोषिक ७५ लाख रुपये, द्वितीय पारितोषिक ५० लाख रुपये, तृतीय पारितोषिक २५ लाख रुपये आणि प्रत्येक सहभागी संघांना प्रत्येकी ३ एक लाख रुपये पारितोषिक दिले जाणार आहे.

प्रो गोविंदा सीझन ३ च्या चषकाचे अनावरण प्रसिद्ध किक्रेटपटू तथा प्रो गोविंदा सिझन ३ चे ब्रँड अँबेसेडर ख्रिस गेल, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि बार्सिलोनाच्या विला फ्रांका येथील विश्व विक्रम विजेत्या मानवी मनोरा आंतरराष्ट्रीय संघाचे ऑना मनरेसा बसोली, बाख लेल आँटोनी, फेलिक्स डियाझ प्रिंटो मसाना आणि मिकेल फेरेट मिरालेस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यानंतर गोविंदांनी सात थरांच्या मानवी मनोऱ्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी ख्रिस गेल यांनी गोविंदा लीगचा ब्रँड अँबेसेडरचा मान आपल्याला दिल्याने हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे सांगितले.

आपण जगभरात विविध खेळ पाहिले पण गोविंदांमधील ऊर्जा, समन्वय आणि सांस्कृतिक अभिमान अतुलनीय आहे. प्रो गोविंदा लीग केवळ परंपरेचा उत्सव नाही तर हा एक अनोखा क्रीडा प्रकार आहे. ज्यामध्ये जागतिक स्तरावर लोकांना आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता, शारीरिक ताकद, सांघिक कौशल्य आणि परंपरेचा अफलातून मिलाप असल्याचे पाहायला मिळतेजो जगाने यापूर्वी कधीही पाहिला नसेल. या प्रवासाचा एक भाग होताना आपल्याला खूप आनंद होत असून या स्पर्धेच्या अंतिम फेरीची आपण आतुरतेने वाट पहात असल्याचे ख्रिस गेल याने म्हटले. तर प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी राज्यातील दहीहंडी परंपरेला जागतिक क्रीडाचा दर्जा मिळवून देणे, हा प्रो गोविंदा लीग आयोजनामागील उद्देश असल्याचे सांगितले.

प्रो गोविंदा लीगच्या आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक पर्वासाठी आम्ही खूप उत्सुक असून एकेकाळी स्थानिक पातळीवर साजरा होणारा उत्सव आता संस्कृती, शिस्त, सामर्थ्य आणि सांघिक कौशल्याचे जागतिक प्रदर्शन बनला आहे. ख्रिस गेल सारख्या आंतरराष्ट्रीय आयकॉनच्या सहभागामुळे प्रो गोविंदा तिसऱ्या पर्वाला एक वेगळी उंची प्राप्त झाल्याने गोविंदांना आपली ऊर्जा आणि कौशल्य सादर करण्यासाठी प्रो गोविंदा लीग हे एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे त्यांनी म्हटले.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली पारंपरिक दहीहंडी उत्सवाला व्यावसायिकरित्या साहसी खेळ म्हणन एक नवी ओळख मिळाली असून राज्य शासनाने त्याला अधिकृत मान्यता दिली आहे. प्रो गोविंदा लीग हा सांस्कृतिक वारसा जतन करताना तरुण गोविंदांना कौशल्य दाखवण्यास एक स्पर्धात्मक व आधुनिक व्यासपीठ उपलब्ध करून देते. या खेळातून ताकद, शिस्त व सांघिक कौशल्य प्रदर्शित केले जात असल्याचे पूर्वेश यांनी शेवटी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT