मिरा रोड : घोडबंदर, रेतीबंदर मॉर्डन कंपनी गेट जवळ एका 13 वर्षीय मुलाला 10 सप्टेंबर रोजी चिडवल्याचा राग आल्याने एका तेरा वर्षाच्या मुलाने रागाच्या भरात बाजूला पडलेला विटेचा तुकडा 12 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात भिरकावून मारल्याने त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काशिगाव पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत झाल्याने 13 वर्षीय बालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घोडबंदर, रेतीबंदर येथील कंपनी जवळ 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9च्या सुमारास 12 वर्षाचा मयत मुलगा याने खेळता खेळता दुसर्या एका 13 वर्षीय बालकास चिडवले. बालकाला राग आल्याने त्याने जमिनीवर पडलेला वीटेचा तुकडा उचलून मयत मुलाला फेकून मारला. तो त्याच्या डाव्या बाजूच्या डोक्यात लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता.
त्याला प्राथमिक उपचार करण्यासाठी घोडबंदर येथील क्लिनिकमध्ये नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले होते. परंतु 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.15 च्या सुमारास उपचारादरम्यान रुग्णालयात डॉक्टरांनी मुलाला मयत घोषित केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.