डॉ. सचिन जायभाये
चिकुनगुनिया हा पावसाळ्यात प्रादुर्भाव करणार्या मलेरिया व डेंगीसारखाच एक संसर्गजन्य आजार आहे. मुख्यत: ताप व सांधेदुखी ही त्याची महत्त्वाची लक्षणे आहेत. भारतामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या लक्षणियरित्या वाढताना आढळते.
चिकुनगुनिया हा आजार चिकुनगुनिया विषाणुंमुळे होतो. चिकुनगुनिया विषाणू हे टोगाव्हायरस कुटुंबामधले विषाणू आहेत. हे विषाणू डासांच्या माध्यमातून पसरतात (अर्थ्रोपोड बॉर्न) म्हणून त्यांना अर्बोव्हायरस असेही एक नाव आहे.
1952-53 मध्ये टांझानियामध्ये तीव्र सांधेदुखी व अतिशय थकवा अशी लक्षणे असलेल्या विषाणूजन्य तापाच्या साथीचा उद्रेक झाला. तीव्र सांधेदुखीमुळे असे रुग्ण अंग़ाचे मुटकुळे करून झोपत असल्याचे निदर्शनास आले. टांझानियाच्या दक्षिणपूर्व भागात जेथे मकोंडे जमातीचे आदिवासी लोक राहतात त्या भागात याचा प्रादुर्भाव अधिक होता. हे आदिवासी लोक त्यांच्या किमाकोंडे या बोलीभाषेत ‘अंग़ाचे मुटकुळे करून झोपणे’ याला चिकुनगुनिया असे म्हणतात. चिकुनगुनिया विषाणूंच्या नावाची व्युत्पत्ती अशी आहे.
चिकुनगुनिया साधारणत: अफ्रिका व आशिया खंडात प्रामुख्याने दिसून येणारा आजार आहे. 21व्या शतकात मात्र युरोप व अमेरिकेतही काही ठिकाणी चिकुनगुनियाच्या साथी आल्याचे निदर्शनास आले. भारतात सर्वप्रथम 1963 व 1965 साली चेन्नई व कोलकाता येथे चिकुनगुनियाच्या साथी आल्याचे दिसले. मध्यभारतात 2006-2007 मध्ये तर उत्तर भारतात 2015 -2016 मध्ये चिकुनगुनियाची मोठी साथ आली होती. चिकुनगुनियाचे विषाणू एका रुग्णापासून दुसर्या रुग्णापर्यंत एडिस जातीच्या डासांच्या माध्यमातून पसरतात. चिकुनगुनियाचे विषाणू माणसांव्यतिरिक्त काही पक्षी व प्राण्यांमध्ये देखील संक्रमण करतात.
एडिस डास चावल्यानंतर चिकुनगुनियाचे विषाणू त्वचेमध्ये प्रवेश करतात. त्वचेतील फायब्रोब्लास्ट पेशींमध्ये चिकुनगुनिया विषाणूंचे प्राथमिक प्रजनन होऊन ते अधिक संख्येने रक्तामध्ये प्रवेश करतात. रक्तामध्ये एकदा प्रवेश झाला की ते शरीरभर पसरतात, मात्र स्नायू, सांधे, यकृत,प्लीहा ही या विषाणूंची शरीरातील काही आवडती ठिकाणे आहेत. जेथे ते जमाव करून राहणे पसंत करतात. साहजिकच स्नायू, सांधे, यकृत, प्लीहा ( व लहान मुलांमध्ये मेंदू) हे अवयव चिकुनगुनियामध्ये शरीरातील इतर अवयवांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावित होताना दिसतात.
जंतूंनी शरीरात प्रवेश केल्यापासून पहिले लक्षण येईपर्यंतचा कालावधी इंक्युबेशन पीरियड या नावाने ओळखला जातो. चिकुनगुनिया विषाणूंसाठी इंक्युबेशन पीरियड 2 ते 12 दिवस एवढा असतो. काही रुग्णांमध्ये लक्षणांशिवाय विषाणू शरीरात संक्रमण करत राहू शकतात.
मात्र इतर संसर्गजन्य आजारांच्या तुलनेत चिकुनगुनियामध्ये अशा रुग्णांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी असते. साधारणत: 75 ते 95% रुग्णांमध्ये चिकुनगुनियाची लक्षणे शेवटी निर्माण होतातच. थंडी भरून ताप येणे, तीव्र स्नायुदुखी व सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे ही मुख्य लक्षणे आढळतात. यामध्ये लक्षणांच्या एकूण प्रवासाचे तीन टप्पे दिसतात. पहिल्या टप्प्याला व्हायरल फेज असे म्हणतात.
या टप्प्यात विषाणू रक्तात मुबलक प्रमाणात असतात. हा टप्पा सुरुवातीचे 5 ते 7 दिवस राहतो. यानंतर येणार्या दुसर्या टप्प्याला कॉन्हॅलसंट फेज असे म्हणतात. या टप्प्यात विषाणूंचे रक्तातील प्रमाण कमी होत जाते व त्या प्रमाणात ताप आणि पुरळ कमी होत जाते. हा टप्पा साधारणत: 10 दिवस राहतो. तिसर्या टप्प्याला क्रोनिक फेज असे म्हणतात. या टप्प्यात संसर्गाच्या आधीच्या टप्प्यांमध्ये सांध्यांना आलेली सूज कायम राहू शकते.
वेगवेगळ्या रुग्णांमध्ये या टप्प्याचा कालावधी वेगवेगळा असतो. बरेचदा क्रोनिक फेज काही दिवस ते काही आठवड्यां -पर्यंत टिकते परंतु काही रुग्णांमध्ये ती 6 महिने ते 1 वर्ष देखील राहण्याचा संभव असतो. संधीवात सदृश सांधेदुखी हे या टप्प्याचे व्यवच्छेदक लक्षण असते. यकृताला सूज येऊन काविळ होणे, प्लेट्लेट्स कमी होऊन शरीरात रक्तस्त्राव होणे, मेंदूला सूज येऊन आकडी येणे वा शुद्ध हरपणे असे काही गुंतागुतीचे दुष्परिणाम चिकुनगुनियात होऊ शकतात. परंतु त्यांचे प्रमाण कमी असते. साधारण चिकुनगुनिया हा आजार जीवावर बेतणारा आजार नसतो.
चिकुनगुनियाच्या विषाणूंनी रक्तात प्रवेश केल्यानंतर शरीर त्या विषाणूंवर प्रतिहल्ला करण्यासाठी काही अँटिबॉडीज तयार करते. रक्तातील अशा अँटिबॉडीज शोधणे हा चिकुनगुनियाचे निदान करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. एलायझा, हिमॅग्लुटिनेशन इनहिबिशन, न्युट्रलाय्झेशन, काँप्लिमेंट फिक्सेशन अशा काही टेस्ट्स यासाठी उपलब्ध आहेत. चिकुनगुनियानंतर शरीराला या अँटिबॉडीज तयार करायला वेळ लागतो. हा काळ 5 ते 7 दिवसांचा असतो व तो मुख्यत्वे रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अवलंबून असतो. याला विंडो पीरियड असे म्हणतात.
या दरम्यान चिकुनगुनिया झाला तरी शरीराने अँटिबॉडीज तयार केल्या नसल्याने टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. याला फॉल्स निगेटिव्ह टेस्ट म्हणतात. त्यामुळे टेस्ट निगेटिव्ह असेल तर आजार नाही एवढा सरळसोट त्याचा अर्थ काढणे चुकीचे असते. व्हायरल कल्चर ही टेस्ट विश्वासार्ह मानली जाते. पुणे येथील संस्थेमध्येे याची सोय आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विषाणूजन्य आजाराची साथ निदर्शनास आल्यानंतर काही रुग्णांची रक्ततपासणी या संस्थेमार्फत करून विषाणुंचे योग्य निदान केले जाते. इंसेक्टिसाइड्सची फवारणी करणे हा चिकुनगुनियासाठी सर्वोत्तम उपाय आहे. उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनेकडे लक्ष केंद्रित करणे ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे.