नाशिक : मंत्रिपदावरून डावलल्या गेल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून नाराजीची साधी दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री छगन भुजबळ यांनी दबावतंत्राला सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. 23) भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेत बंद दरवाजाआड तब्बल अर्धा तास चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडून आठ ते दहा दिवसांचा कालावधी मागितला असून, ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्याला दिले असल्याचे भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ज्येष्ठ असूनही महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळे भुजबळ नाराज असून, त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे. भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार की, समर्थकांच्या मागणीनुसार ओबीसींचा स्वतंत्र पक्ष काढणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भुजबळांनी 'जहा नहीं चैना, वहां नहीं रहना' अशा आशयाचे विधान करून आधीच खळबळ उडवून दिली आहे. भुजबळांनी सोमवारी (दि.23) मुख्यमंत्री फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भेटीत नेमके काय घडले, याबाबत त्यांनी माहिती दिली.
फडणवीसांना आपण सगळे सांगितले असून, त्यांनी ८ ते १० दिवसांचा कालावधी मागितल्याचे ते म्हणाले. तसेच, ओबीसी समाज नाराज असल्याचे आपल्याला कळतेय आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आपण नक्की विचार करू, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ आम्ही दोघांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यात सामाजिक, राजकीय विषयांचा समावेश आहे.
बारामतीतील मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांचे नाव न घेता टीका केली. 'काही वरिष्ठांना मंत्रिपद दिले नाही, याचे कारण तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची असते,' असे पवारांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया विचारली असता, भुजबळ म्हणाले, 'तरुणांना मंत्रिमंडळात संधी द्यायची ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तरुणांना संधी द्यायची यासाठी व्याख्या ठरवली पाहिजे. मग त्यामध्ये किती वर्षांपर्यंत तरुण म्हणायचे? मग 67 ते 68 वर्षांपर्यंतही तरुण म्हणायचे का? हे ठरवले पाहिजे ना?, असा टोला भुजबळ यांनी नाव न घेता अजित पवारांना लगावला.