भिवंडी : भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास केमिकल गोदामास लागलेल्या भीषण आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली.सोमनाथ भोजने (वय 48, रा. कल्याण) असे या मयत कामगाराचे नाव आहे.
शनिवारी सायंकाळी वळ ग्रामपंचायत हद्दीत भोईर कंपाऊंड या केमिकल साठवलेल्या गोदामास भीषण आग लागली. ही आग वाढत गेल्याने 18-20 गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. केमिकल गोदामातील ड्रमचा स्फोट होऊन ही आग पसरत असताना या आगीच्या झळा मागील व पुढील बाजूकडील गोदामांनाही बसल्या.
मध्यरात्रीच्या सुमारास मागील बाजूकडील गोदामातील कामगार सोमनाथ भोजने हा गोदामातील काही साहित्य घेण्यासाठी गेला असता त्याचा होरपळून मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मागील बाजूला गोदामाबाहेर आढळून आला. नारपोली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास शासकीय रुग्णालयात रवाना केला.
भिवंडीसह कल्याण, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर व अंबरनाथ एमआयडीसी यांच्या अग्निशमन दलाने ही आग पहाटे चार वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणली. रविवारी सकाळी घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांमार्फत आग कुलिंगचे काम करण्यात आले तर नारपोली पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
ग्रामीण भागात गोदामांना लागणार्या आगीच्या घटना या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. येथील आग आटोक्यात आणण्यासाठी वाहतूक कोंडीसह पाण्याची कमतरता भासत असल्याने यातमोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होत आली आहे. त्यामुळे या भागात अग्निशमन केंद्र असावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.