सापाड : डोंबिवली एमआयडीसी परिसरात गटारातून वाहणारे केमिकलयुक्त सांडपाणी आणि त्याच नाल्यालगत गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. औद्योगिक सांडपाणी, कचरा, मृत जीव-जंतू आणि प्रचंड दुर्गंधी यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून डोंबिवलीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
एमआयडीसीमधील काही उद्योगांकडून प्रक्रिया न केलेले रासायनिक सांडपाणी थेट उघड्या गटारात सोडले जात आहे. या गटारातून काळपट, फेसाळ आणि तीव्र वास येणारे पाणी सतत वाहताना दिसते. विशेष म्हणजे याच गटाराच्या बाजूने एमआयडीसीची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे.
गटारातील पाणी आणि पाईपलाईन यांच्यातील अंतर अत्यल्प असल्याने गळती झाल्यास दूषित पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याचा धोका नागरिकांनी व्यक्त केला आहे. गेल्या काही महिन्यांत परिसरात त्वचारोग, पोटदुखी, अतिसार, उलट्या तसेच श्वसनाचे त्रास वाढल्याची माहिती स्थानिकांनी दिली. पाण्याला विचित्र वास येतो आणि कधी कधी पाण्याचा रंगही बदललेला दिसतो.
औद्योगिक रसायनांमध्ये जड धातू आणि विषारी घटक असू शकतात. हे घटक दीर्घकाळ शरीरात गेल्यास यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. गटारात रासायनिक पाणीच नाही, तर प्लास्टिक, कचरा आणि मृत प्राणी टाकले जातात. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून दुर्गंधी असह्य झाली आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते.
डोंबिवलीकरांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला आहे. या भागाचे प्रशासकीय नियंत्रण कल्याण डोंबिवली महानगरपालिकाकडे असून औद्योगिक नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. मात्र, दोन्ही यंत्रणांकडून परस्पर जबाबदारी चाल ढकल केली जात असल्यामुळे स्थानिक नागरिकांचा प्रशासनावरील रोष वाढत चालला आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर पाहणी केली असल्याचे सांगितले जाते; परंतु गटारातील केमिकलयुक्त पाणी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना अद्याप दिसत नाहीत. एमआयडीसीकडून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे, मात्र त्याचा अहवाल अद्याप जाहीर झालेला नाही.
नियमभंग करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी
डोंबिवलीकरांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही. दोषी उद्योगांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गटारातील केमिकलयुक्त पाणी तात्काळ थांबवण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे, तर सर्व उद्योगांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनची संपूर्ण तपासणी व बदल करावा. नियमित पाण्याचे नमुने तपासून अहवाल सार्वजनिक करावा. गटार झाकून स्वच्छता मोहीम राबवावी अशा मागण्या नागरिकांकडून उपस्थित होत आहेत.यासंदर्भात माहिती घेण्यासाठी एमआयडीसीचे अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.